पुणे : पिशवी 8 रुपयांची अन् दंड तब्बल 25 हजारांचा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 जानेवारी 2020

- साहित्याच्या खरेदीबरोबर दिलेल्या पिशवीसाठी दंड 

पुणे : बुटाचा बॉक्‍स घेऊन जाण्यासाठी दिलेल्या कागदी पिशवीसाठी ग्राहकाकडून आकारलेले आठ रुपये परत करण्याचा आदेश ग्राहक मंचने रिलायन्स क्‍लोदिंग इंडिया या कंपनीला दिला आहे. तक्रारदाराला झालेल्या शारीरिक आणि मानसिक त्रासापोटी व तक्रारीचा खर्च म्हणून 25 हजार रुपयेदेखील कंपनीला द्यावे लागणार आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

विमानामध्ये झुरळ सापडल्याने दोन प्रवाशांना नुकसानभरपाईचा आदेश ग्राहक मंचने विमान कंपनीला दिला होता. हा निकाल ताजा असतानाच आणखी एका निकालाने 'ग्राहक हाच राजा' असल्याचे अधोरेखित झाले आहे. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचचे अध्यक्ष उमेश जावळीकर, सदस्या क्षितिजा कुलकर्णी, संगीता देशमुख यांनी हा निकाल दिला. 

खातेवाटपाचा घोळ संपेना! 

याप्रकरणी दविंदर सिंह (रा. सिक्‍युरिटी सेक्‍शन, विमाननगर) यांनी स्टोअर मॅनेजर, रिलायन्स क्‍लोदिंग इंडिया प्रा. लि. (फिनिक्‍स मार्केट सिटी, विमाननगर) यांच्याविरुद्ध तक्रार केली होती. सिंह यांनी प्रतिवाद्यांकडून 25 एप्रिल 2019 रोजी दोन बूट विकत घेतले. त्यांच्या बॉक्‍ससाठी कागदी पिशवी देत त्याची किंमत आठ रुपये कंपनीने घेतली. त्यावर सिंह यांनी चंडीगढ ग्राहक आयोगाने दिलेल्या निकालाची माहिती देऊन कागदी पिशवीचे आठ रुपये देण्यास तक्रारदार जबाबदार नाहीत, असे सांगून आठ रुपये परत देण्याची मागणी केली. मात्र, त्यांना आठ रुपये परत देण्यात आले नाहीत. पिशवीवर तिची किंमत नमूद नव्हती. 

अयोग्य पद्धतीने विक्रीची दखल 

कंपनीने तक्रारदाराचा वापर जाहिरातदार म्हणून केला. तक्रारदाराला सेवा-सुविधा पुरविण्यात कसूर ठेवून अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केल्याने तक्रारदाराला नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी करणारी नोटीस विरुद्ध पक्षाला म्हणजे कंपनीला पाठविण्यात आली होती. 

तक्रारदाराला पिशवीची योग्य पद्धतीने विक्री न केल्याने तिची रक्कम परत मागणे न्याय ठरते. तक्रारदाराला कराराप्रमाणे सेवा-सुविधा देण्यास कंपनीने कसूर केला, असे मंचने निकालात नमूद केले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Administration Fine to Shoe Storekeeper of Rupees 25 Thousand