पीएमपीच्या बसमधील फुकट्यांना चाप

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 जानेवारी 2020

शहर आणि पिंपरी-चिंचवडमध्ये पीएमपीच्या बसमधील ‘फुकट्या’ प्रवाशांना पकडण्यासाठी प्रशासनाने आता ३५ तपासनीस नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. सुमारे २४ तास या पथकांचे काम सुरू राहणार आहे. तिकीट तपासणीच्या पथकांतील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या कामाचा आढावा घेण्यासाठीही विशेष पथक तैनात केले आहे.

पुणे -  शहर आणि पिंपरी-चिंचवडमध्ये पीएमपीच्या बसमधील ‘फुकट्या’ प्रवाशांना पकडण्यासाठी प्रशासनाने आता ३५ तपासनीस नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. सुमारे २४ तास या पथकांचे काम सुरू राहणार आहे. तिकीट तपासणीच्या पथकांतील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या कामाचा आढावा घेण्यासाठीही विशेष पथक तैनात केले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पीएमपीमध्ये सुमारे १४०० कंडक्‍टर्स, ड्रायव्हर्स आणि अन्य कर्मचाऱ्यांच्या नुकत्याच बदल्या झाल्या. त्यात अनेक कंडक्‍टर्सपैकी सुमारे ३४१ जणांना कंट्रोलर, चेकर (तिकीट तपासनीस) या पदाची बढती मिळाली आहे. त्यामुळे शहर आणि पिंपरी- चिंचवडमध्ये तिकीट तपासणी पथके वाढविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या दोन्ही शहरांत यापूर्वी १५ पथके होती,  त्यात आता २० ने वाढ झाली आहे. प्रत्येक पथकात ४ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. 

या पथकांत पूर्वी चालक म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचांही समावेश केला आहे. एखाद्या बसमध्ये तांत्रिक बिघाड आहे, असे चालकाने सांगितल्यास तिकीट तपासणी पथकात नियुक्त केलेला तो तपासनीस खातरजमा करणार आहे.

या गोष्टीही तपासणार
नव्या पथकांद्वारे प्रवाशांच्या तिकिटांची तपासणी करतानाच आता बसमध्ये रूट बोर्ड लावला आहे का, सर्व थांब्यांवर बस थांबते का, एलईडी डिस्प्ले बोर्ड सुरू आहे का, बस स्वच्छ आहे का आदींबाबतही तपासणी करण्यात येणार आहे.

कर्मचारी सुचविणार उत्पन्नवाढीचा फंडा
३४१ कंडक्‍टर, ड्रायव्हर आता कंट्रोलर किंवा तिकीट चेकर झाले आहेत. त्यांची पहिली बैठक २५ जानेवारी रोजी प्रशासनाने आयोजित केली आहे. बैठकीस येताना प्रत्येक अधिकाऱ्याने प्रवासी आणि उत्पन्नवाढीसाठी कसे प्रयत्न करता येतील, याबाबतचे मुद्दे लिहून आणण्यास प्रशासनाने सांगितले आहे. हे सर्व अधिकारी आणि कर्मचारी अनुभवी आहेत. त्यामुळे त्यांच्या सूचनांमधून पीएमपीचे नक्कीच सक्षमीकरण होऊ शकते, असा विश्‍वास वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: administration has now decided to appoint five investigators to withour ticket passengers on the PMP bus