बारामतीतमधील व्यवहारांबाबत झाला मोठा निर्णय; 'या' दिवसापासून होणार अंमलबजावणी

मिलिंद संगई
Sunday, 12 July 2020

शहरात आज एकाच दिवशी कोरोनाचे 18 रुग्ण सापडल्यानंतर आता बारामतीतील व्यवहारांवर निर्बंध आणण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

बारामती : शहरात आज एकाच दिवशी कोरोनाचे 18 रुग्ण सापडल्यानंतर आता बारामतीतील व्यवहारांवर निर्बंध आणण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. सोमवारपासून (ता. 13) बारामतीतील सर्व व्यवहार सकाळी नऊ ते दुपारी तीन वाजेपर्यंतच सुरु असतील अशी माहिती उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी दिली.

काँग्रेसला बसणार मोठा धक्का? २२ आमदार दिल्लीत  

दुपारी तीन नंतर अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्वांना आपले व्यवहार बंद ठेवावे लागतील. बारामतीत आज एकाच दिवशी तब्बल 18 रुग्ण सापडले. लासुर्णे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील परिचारिकेच्या संपर्कातील अनेक जण एकाच दिवशी पॉझिटीव्ह आल्याने बारामतीकरांचे आज धाबे दणाणले होते. त्या पार्श्वभूमीवर आज उपविभागीय अधिका-यांनी वरिष्ठ अधिकारी व पदाधिका-यांची तातडीची बैठक घेतली. या बैठकीत काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले.

दरम्यान, यात व्यवहारांवर दुपारी तीन वाजेपर्यंत मर्यादा आणण्याच्या निर्णयासह शहरातील व्हेंटीलेटर्सची सुविधा असलेल्या रुग्णालयांना ताब्यात घेण्याचीही प्रक्रीया उद्या राबवली जाणार असून, रुग्ण तपासणीसाठीही आता वेगळी प्रक्रीया राबविली जाणार आहे. एकदम तपासणीसाठी रुई येथे होणारी गर्दी टाळण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. 

आज झालेल्या बैठकीत ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर यांनी लॉकडाऊनची जोरदार मागणी केली. सामाजिक संसर्ग होऊन एकदम उद्रेक होऊ नये या साठी ही साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊनची गरज त्यांनी बोलून दाखविली. दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अँड. सुधीर पाटसकर व अँड. भार्गव पाटसकर यांनीही बारामती लॉकडाऊनची मागणी केली आहे. 
पुणे, मुंबई बंद असल्याने बारामतीत लोक विविध वस्तू, कपडे, सोनेखरेदीसाठी मोठी गर्दी करीत आहेत, त्या मुळे बाहेरगावाहून येणा-या लोकांमुळे शहरात कोरोनाचा उद्रेक होण्याची भीती व्यक्त होत आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Administration's decision to restrict transactions in Baramati