करु का अजितदादांना फोन; प्रशासकीय यंत्रणेवर कमालीचा ताण

टीम ई सकाळ
Monday, 31 August 2020

काहीही झाले की करु का अजितदादांना फोन....या विशेषतः ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांच्या धमकीने यंत्रणा पार वैतागून गेली आहे. 

बारामती : तपासण्यांची वाढलेली संख्या, त्यातच पॉझिटीव्ह येणा-यांची वाढती संख्या, त्यांच्या संपर्कातील लोकांची तपासणीची घाई व थोडासा ताप, सर्दी, खोकला आला की तपासणीसाठी होणारा आग्रह या सर्व बाबींचा प्रशासकीय यंत्रणेवर कमालीचा ताण येऊ लागला आहे. काहीही झाले की करु का अजितदादांना फोन....या विशेषतः ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांच्या धमकीने यंत्रणा पार वैतागून गेली आहे. 

ताज्या बातम्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे अॅप

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

बारामतीत आरोग्य, महसूल, नगरपालिका, पंचायत समिती या सह सर्वच यंत्रणा रात्रंदिवस काम करीत आहेत. प्रयोगशाळा तपासणीचे कामही अव्याहतपणे सुरु आहे. इतर तालुक्यांच्या तुलनेत बारामतीत तपासणी संख्या व रिपोर्ट मिळण्याची गती दोन्हीही जास्त आहे. तपासणीमध्ये अनेक जण पॉझिटीव्ह येतात, त्यांच्या संपर्कातील व्यक्ती शोधणे, त्यांच्या तपासण्या, प्रतिबंधित क्षेत्र करणे, रुग्णांच्या निवास, भोजनाची सोय करणे, रुग्णवाहिका पाठवून रुग्णांना दाखल करुन घेणे, प्रकृती चिंताजनक असलेल्या रुग्णांचा जीव वाचविण्याची धडपड करणे, यातच कोणाचा मृत्यू झाला तर त्याच्या अंत्यसंस्काराची व्यवस्था करणे या सारख्या कामात यंत्रणा अव्याहतपणे काम करते आहे. 

अशा प्रकारचे संकट प्रथमच आल्याने अनेकदा येणा-या अडचणींचा अंदात प्रशासनालाही नसतो, त्या मुळे अडचण निर्माण झाल्यावर त्या वर मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जातो. अनेकदा साधनांच्या कमतरतेसह मनुष्यबळाचीही अडचण यंत्रणेसमोर असते. नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करतानाच प्रशासनातील व्यवस्थेलाही सांभाळून घेण्याची कसरत अधिका-यांना करावी लागते आहे. 

ग्रामीण भागातून रुग्णांना घेऊन येणा-या रुग्णवाहिकांच्या बाबतीत, रुग्ण दाखल करुन घेण्यासह इतर सुविधांच्या बाबतीतही थोडा उशीर झाला की गावपातळीवरील कार्यकर्ते अधिका-यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडेच थेट तक्रारीची धमकी देतात. गेल्या 18 मार्च पासून सर्वच यंत्रणा सुटी न घेता सातत्याने काम करत असल्याने दमून गेली आहे. पण शहर असो की तालुका प्रत्येक रुग्णालाच व्हीआयपी ट्रीटमेंटची अपेक्षा प्रशासनाकडून असल्याने थेट अजितदादांना फोनवरुन तक्रारीचा दमच अधिका-यांना दिला जातो. अनेकदा अधिका-यांशी होणा-या संवादाचे रेकॉर्डींग करुन ते व्हायरल करण्याच्याही धमक्या दिल्या जातात. 

कामाच्या ताणाने त्रस्त असलेली यंत्रणा आता या नव्या बाबीला तोंड देत काम करत असल्याने वरिष्ठ पदाधिका-यांनी यात समन्वयाची भूमिका घेण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. अधिका-यांचाही आता संयम सुटत असल्याने यात समन्वय राखणे गरजेचे बनले आहे.

सर्वांनी समजून घ्यायला हवे...
प्रत्येक रुग्णाला चांगली व्यवस्था देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. केंद्र व राज्य सरकारची नियमावली व उपलब्ध यंत्रणा यांचा समन्वय साधून प्रशासन रात्रंदिवस काम करण्याचा प्रयत्न करीत आहे. या स्थितीत लोकांनी संय़म ठेवून प्रशासनाचे मनोधैर्य वाढविण्याची गरज आहे. - डॉ. मनोज खोमणे, तालुका आरोग्य अधिकारी, बारामती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Administrition of baramati is under stress due to Citizens