
कालबाह्य झालेल्या एसटीपीला अद्ययावत करण्यासाठी सल्लागार
पुणे - महापालिकेने शहरातील मैलापाणी शुद्ध करण्यासाठी उभारलेले मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्प (सिवेज ट्रीटमेंट प्लांट- एसटीपी) कालबाह्य झाले आहेत. केंद्रीय प्रदूषण मंडळाच्या नव्या निकषानुसार ९ प्रकल्पांना अद्ययावत करण्यासाठी महापालिकेने राज्य शासनाच्या महात्मा फुले रिन्युएबल एनर्जी ॲण्ड इन्फ्रास्ट्रक्चर टेक्नॉलॉजी लिमिटेड (महाप्रित) या संस्थेची सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे. याचा प्रस्ताव आज (ता. २२) स्थायी समितीच्या बैठकीत मंजूर केला.
महापालिकेचे एसटीपी प्रकल्प कालबाह्य झाल्याचे वृत्त ‘सकाळ’ने प्रकाशित केले होते. मुळा मुठा नदीमध्ये रोज ९९० एमएलडी मैलापाणी येत आहे, त्यापैकी सुमारे ५५० एमएलडी पाण्यावर सध्या प्रक्रिया करून ते पुन्हा नदीत सोडले जाते. यासाठी महापालिकेने १० एसटीपी बांधले होते. गेल्या १५ वर्षापासून हे प्रकल्प सुरू आहेत. उर्वरित ३९६ एमएलडी पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी मुळामुठा नदी सुधार प्रकल्पाचे (जायका) काम सध्या प्राथमिक अवस्थेत असून, आॅक्टोबर नंतर याचे प्रत्यक्षात काम सुरू होणार आहे. पुणे महापालिकेने २००८ पूर्वी शहरात १० मैला शुद्धीकरण केंद्र उभारले असले तरी त्यापैकी एक नायडू रुग्णालय येथील प्रकल्प पाडण्यात आला आहे. सध्या ९ प्रकल्पांद्वारे नदीत येणारे मैलापाणी शुद्ध केले जात आहे.
केंद्रीय प्रदूषण मंडळाने निकष बदलल्याने हे एसटीपी केंद्र कालबाह्य झाले आहेत. नव्या निकषानुसार नदीतील पाणी जास्त स्वच्छ करण्यासाठी बीओडी १० मिली ग्रॅम आणि सीओडी ५० मिली ग्रॅम पेक्षा कमी असणे आवश्यक आहे. मात्र, पुण्यातील मैला शुद्धीकरण केंद्रातून शुद्ध होणाऱ्या पाण्यात बीओडी ५० व सीओडी १००च्या पुढे आहेत. त्यामुळे हे प्रकल्पातील यंत्रसामग्री, तंत्रज्ञान अद्ययावत करणे गरजेचे आहे. त्यासाठी महाप्रित या संस्थेची सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे.