अजित पवारांच्या झाडाझडतीनंतर मदनवाडी घाटातील वळणे काढण्याचे काम वेगात सुरु

प्रा. प्रशांत चवरे
Thursday, 19 November 2020

अजित पवार यांच्या सूचनेनंतर भिगवण-बारामती रस्त्यावरील वळणे काढण्याचे काम वेगात सुरु आहे. मदनवाडी घाटातील वळणाच्या ठिकाणचा सुमारे साडेसहाशे मीटर रस्ता रुंद करुन त्या ठिकाणची वळणे कमी करण्यात येत आहे.

भिगवण : येथील भिगवण बारामती रस्त्यावर मदनवाडी (ता. इंदापुर) घाटांमध्ये वाढलेल्या अपघाताचे प्रमाण विचारात घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या रस्त्यावरील वळणे काढण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागास दिल्या होत्या. त्यानंतर काही दिवसांपुर्वी ते भिगवण-बारामती रस्त्यावरुन जात असताना हे काम झाले नसल्याचे व परिस्थिती जैसे थे असल्याचे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी अधिकाऱ्यांची झाडाझडती घेत हे काम सुरु करण्याच्या सूचना केल्या होत्या. सध्या भिगवण-बारामती रस्त्यावरील रस्ता रुंदीकरण करुन मदनवाडी घाटातील वळणे काढण्याचे काम वेगात सुरु आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

येथील इंदापूर पंचायत समितीचे माजी सभापती रमेश जाधव यांचे भिगवण-बारामती रोडवर मदनवाडी (ता. इंदापुर) घाटांमध्ये अपघात होऊन गतवर्षी ऑक्टोंबरमध्ये निधन झाले होते. जाधव कुटुंबियांचे सात्वंन करण्यासाठी आल्यानंतर अपघाताबाबत चौकशी करत असताना धोकादायक वळणे अपघातास कारणीभुत असल्याचे पवार यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना भिगवण-बारामती रस्त्यावरील मदनवाडी घाटातील वळणे काढण्याच्या सूचना दिल्या होत्या, परंतु त्यासह बराच अवधी गेल्यानंतरही परिस्थिती जैसे थे होती.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार या रस्त्यावरुन जात असताना मदनवाडी घाटातील वळणाजवळ थांबून पाहणी केली व परिस्थिती जैसे थे असल्याचे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी अधिकाऱ्यांची झाडाझडती घेत वळणे काढण्याचे काम करण्याच्या सूचना केल्या होत्या.

 पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अजित पवार यांचे सुचनेनंतर भिगवण-बारामती रस्त्यावरील वळणे काढण्याचे काम वेगात सुरु आहे. मदनवाडी घाटातील वळणाच्या ठिकाणचा सुमारे साडेसहाशे मीटर रस्ता रुंद करुन त्या ठिकाणची वळणे कमी करण्यात येत आहे. वळणाच्या ठिकाणी रस्ता साडेपाच मीटरने वाढविण्यात येत आहे, तर इतर ठिकाणी रस्ता तीन मीटरने वाढविण्यात येत आहे. काम पुर्ण झाल्यानंतर वळणाच्या ठिकाणी बारा मीटर तर इतर ठिकाणी दहा मीटर रस्ता होणार आहे. रस्ता रुंद झाल्यामुळे या भागातील अपघातावर नियंत्रण मिळण्यास मदत होणार असल्यामुळे या भागातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

(संपादन : सागर डी. शेलार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: After the suggestion of deputy chief minister ajit pawar, the work of removing the turns in madanwadi ghat started