एज इज जस्ट अ नंबर ;गुरमित सिंग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गुरमित सिंग चौहान
एज इज जस्ट अ नंबर ;गुरमित सिंग

एज इज जस्ट अ नंबर ;गुरमित सिंग

पुणे : निवृत्तीनंतर अनेकदा लोक ‘ॲडव्हेंचर’ला (Adventure) आपल्या आयुष्यातून डिलीट करून टाकतात. मात्र, ‘एज इज जस्ट अ नंबर’ हे खऱ्या अर्थाने सिद्ध केलं आहे, ते ६५ वर्षीय निवृत्त पोलिसाने. गुरमित सिंग चौहान यांनी वयाच्या पासष्टीतही फुटबॉल आणि सायकलींच्या (Cycling) राज्यस्तरीय मास्टर्स गेम्स या स्पर्धेत सुवर्ण आणि रौप्य पदके जिंकली आहेत, त्यांच्या याच कामगिरीसाठी त्यांना बिहारच्या विक्रमशिला हिंदी विद्यापीठातर्फे ‘खेल शिरोमणी पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

मूळचे पंजाबचे असलेल्या चौहान हे पुणे ग्रामीण पोलिस दलातून उपनिरीक्षक म्हणून निवृत्त झाले आहेत. त्यांचे वडील लष्करात असल्याने त्यांचा जन्म आणि संपूर्ण शिक्षण पुण्यातच झाले. त्यानंतर ते पुणे ग्रामीण पेलिस दलात रुजू झाले. लहानपणापासून खेळाची आवड असल्यामुळे त्यांनी पोलिस दलात असताना राष्ट्रीय हॉकी स्पर्धेत सात वेळा राज्याचे प्रतिनिधित्व केले आहे. सेवा कार्यकाळात त्यांनी ग्रामीण पोलिस हॉकी संघाचा संघनायक म्हणून तीन वेळा जबाबदारी सांभाळली. राज्य व राष्ट्रीय स्तरावरील विविध स्पर्धांमध्ये त्यांना आतापर्यंत २५० हून अधिक पारितोषिके मिळाली आहेत. त्याचबरोबर ते उत्तम भांगडा ही नृत्यकला देखील सादर करतात.

हेही वाचा: सोशल मीडियावर राहून कामे करण्यापेक्षा थेट जनतेची कामे करा

यासंदर्भात गुरमित सिंग म्हणाले, ‘‘पोलिस दलात असताना हॉकीसाठी राज्याचे प्रतिनिधित्व केले, अनेक पदके जिंकली. निवृत्तीनंतर मीही इतरांप्रमाणे घरीच आराम केला. खेळ खेळणे बंद झाल्याने सतत अस्वस्थता जाणवत होती. त्यामुळे सायकलिंग करण्यास सुरुवात केली. गेल्या पाच महिन्यांपासून दररोज ३० किलोमीटर सायकलिंग करत आहे. इंदापूर येथे मास्टर्स गेम्स असोसिएशनच्या स्पर्धेबाबत समजताच त्यात भाग घेण्याचे ठरविले. यासाठी मला कुटुंबीयांचा आणि मित्र परिवाराचा पाठिंबा मोलाचा ठरला. मुंबई येथे होणाऱ्या १० मीटर एअर रायफल शूटींग स्पर्धेतही माझी निवड झाली असून, यातही पदक मिळवणार आहे.’’

‘‘कोणतीही नवीन सुरुवात करताना आपले वय झाले आहे, ही मानसिकता बदलण्याची गरज आहे. ही मानसिकता बदलली, तर नक्कीच माझ्यासारख्या वयात यश मिळू शकते. सध्याची तरुण पिढीदेखील कामाच्या तणावात स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करताना दिसते. आरोग्याला तंदुरुस्त ठेवण्यासाठी खेळ हा एकमेव पर्याय आहे. प्रत्येकात कौशल्य व छंद असतो आणि त्या छंदाला जपले पाहिजे.’’

- गुरमित सिंग चौहान

Web Title: Age Is Just A Number Gurmeet Singh

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Pune NewsAge
go to top