'हॅलो, शेठ तुमच्या त्या साठ गुंठ्याच्या प्लॉटची कागदपत्रे आली...'

'हॅलो, शेठ तुमच्या त्या साठ गुंठ्याच्या प्लॉटची कागदपत्रे आली...'

खेड-शिवापूर : "हॅलो, शेठ तुमच्या त्या साठ गुंठ्याच्या प्लॉटची कागदपत्रे आली होती आमच्याकडे. काय रेट होईल प्लॉटचा." असे फोन येऊ लागल्यावर आपली जमीन कोणी विकायला काढली? असा प्रश्न जमीन मालकांना पडू लागला आहे. कारण जमीन मालकांना काहीही कल्पना नसताना एजंट लोक अनेकांच्या जमिनींची कागदपत्रे बाजारात फिरवू लागले आहेत. या प्रकाराने खेड-शिवापूर परीसरातील भोर आणि हवेली पट्ट्यातील अनेक जमीन मालक त्रस्त झाले आहेत.

जमीन खरेदी विक्रीच्या थंड झालेल्या मार्केटमध्ये लॉकडाऊन संपल्यानंतर काही प्रमाणात तेजी आली आहे. पुणे शहरातील अनेक व्यवासायिक, कंपन्या खेड-शिवापूर परिसरातील भोर आणि हवेलीच्या पट्ट्यात स्थलांतरीत होत आहेत. तर अनेक जण सेकंड होम, फार्म हाऊससाठी किंवा गुंतवणूक म्हणून या भागात जमीन खरेदी करत आहेत. त्यामुळे या भागात जमीन खरेदी-विक्रीच्या प्रमाणात गेल्या काही महिन्यात वाढ झाली आहे. 

मात्र या सगळ्या प्रकारात ज्यांना जमीन विकायची नाही, अशा लोकांनाही त्रास होऊ लागला आहे. जमीन विकायची नसतानाही एजंट लोक त्यांच्या जमिनीची कागदपत्रे विक्रीसाठी असल्याचे सांगून बाजारात फिरवू लागले आहेत. त्यामुळे अशा जमीन मालकांना "तुमच्या अमुक-अमुक गावातील जागेची कागदपत्रे आली होती आपल्याकडे. द्यायचाय का प्लॉट? मग काय रेट होईल?" अशी विचारणा करणारे फोन येऊ लागले आहेत. या प्रकाराने अनेक जमीन मालक त्रस्त झाले आहेत. मात्र केवळ जमीन खरेदी विक्रीच्या व्यवहारातून कमिशन मिळविण्यासाठी जमीन एजंट असे प्रकार करत आहेत. हे एजंट तेवढ्यावरच थांबत नाहीत. तर गावागावातील अनेक शेतकऱ्यांच्या सामाईक क्षेत्रावर या एजंटांचा डोळा आहे. अशी सामाईक क्षेत्र विकण्याची गरज नसतानाही एजंट लोक त्यांच्याशी संपर्क साधतात.  जमीन विकण्यास नकार दिल्यावर सामाईक क्षेत्रातील अनेकांपैकी एक जणाचा किंवा त्यांच्या बहिणीचा हिस्सा विकत घ्यायचा आणि मग बाकीचे क्षेत्र विकायला भाग पाडायचे. असे प्रकार होऊ लागले आहेत. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

खोपी (ता.भोर) येथील शेतकरी दादा पवार यांनाही असाच अनुभव आला आहे. दादा पवार म्हणाले, "आमचे सामाईक क्षेत्र आहे. ते क्षेत्र आम्हाला विकायचे नाही, तरीही त्याबाबत गेल्या काही दिवसांपासून मला अनेक जणांचे क्षेत्र विकायचे आहे का? अशी विचारणा करणारे फोन येऊ लागल्याने मी त्रस्त  झालो आहे. जमीन एजंटांनी ज्यांना खरोखर जमीन विकायची आहे त्यांच्या जमिनीचा खुशाल व्यवहार करावा. मात्र जमीन विकायची नसतानाही जमिनीची कागदपत्रे बाजारात फिरवू नये. आमच्या जमिनीची कागदपत्रे कोणी बाजारात फिरवली याचा शोध घेऊन मी पोलिसांत तक्रार देणार आहे."

(संपादन : सागर डी. शेलार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com