आशा सेविकांचे मानधनासाठी बारामतीत आंदोलन सुरु

मिलिंद संगई
Friday, 13 November 2020

कोरोनाच्या काळात घरोघरी जाऊन सर्वेक्षणाचे महत्वाचे काम या सेविकांनी केलेले आहे. बारामती नगरपालिकेने या आशा सेविकांना प्रत्येकी दोनशे रुपये मानधन व पेट्रोलसाठी शंभर रुपये प्रतिदिन भत्ता नगरपालिकेने देण्याचे मान्य केले होते.

बारामती (पुणे) : येथील नगरपालिकेत कार्यरत असलेल्या 37 आशा सेविकांना गेल्या चार महिन्यांपासून त्यांच्या कामाचा दाम मिळाला नसल्याने या सेविकांनीही नगरपालिकेसमोर आंदोलन सुरु केले आहे.
 
कोरोनाच्या काळात घरोघरी जाऊन सर्वेक्षणाचे महत्वाचे काम या सेविकांनी केलेले आहे. बारामती नगरपालिकेने या आशा सेविकांना प्रत्येकी दोनशे रुपये मानधन व पेट्रोलसाठी शंभर रुपये प्रतिदिन भत्ता नगरपालिकेने देण्याचे मान्य केले होते. जूनपर्यंत आशासेविका इतर जबाबदारी सांभाळून कोरोनाचे काम करत होत्या. मात्र जूननंतर इतर सर्व कामे थांबवून केवळ कोरोना सर्वेक्षणासह कोरोनाशी संबंधित कामांची जबाबदारी आशा सेविकांवर सोपविली गेली. 

हे काम त्यांना देताना नगरपालिकेने मानधन व भत्ता देण्याचे कबूल केले होते, असे आशासेविकांनी नमूद केले. मात्र प्रत्यक्षात आता उद्यावर दिवाळी येऊनही हे पैसे चार महिने नगरपालिकेने दिलेलेच नाहीत, त्यामुळे नाईलाजाने आंदोलनाचा पवित्रा घेण्याची वेळ आल्याचे या सेविकांनी नमूद केले. दरम्यान नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे व मुख्याधिकारी किरणराज यादव यांच्याशी आज आशा सेविकांनी चर्चा केली. या संदर्भात सकारात्मक मार्ग काढू अशी ग्वाही या दोघांनीही दिल्याचे सेविकांनी नमूद केले. 

मानधन वेळेत मिळण्याची गरज

आशा सेविकांनी गेली चार महिने कोरोनाची पर्वा न करता घरोघरी जाऊन सर्वेक्षणासह इतरही जबाबदा-या पार पाडल्या आहेत, या सेविकांना त्यांच्या हक्काचे मानधन मिळण्याची गरज आहे. दिवाळीपूर्वीच हे मानधन दिले जायला हवे होते, आम्हाला आमच्या हक्काच्या पैशांसाठी आंदोलन करावे लागले, ही बाब योग्य नाही. 
- सर्व आशा सेविका, बारामती. 

संपादन - सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: An agitation has been started in front of Baramati Municipality for honorarium of Asha Sevikans