कृषिक प्रदर्शनात राज्यभरातून शेतकऱ्यांचे लोंढे

कृषिक प्रदर्शनात राज्यभरातून शेतकऱ्यांचे लोंढे

Published on

माळेगाव, ता. १८ : माळेगाव खुर्द (ता.बारामती) येथील कृषिक प्रदर्शनात उभारलेल्या प्रात्यक्षिकयुक्त ‘शेती प्लॉट’ पाहण्यासाठी राज्यभरातील शेतकऱ्यांचे लोंढे शिवारात दाखल झाले आहेत. आधुनिक तंत्रज्ञान, शाश्वत शेती पद्धती आणि कमी खर्चात अधिक उत्पादन देणाऱ्या प्रयोगांनी शेतकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. ‘कृषिक हे पीक प्रात्यक्षिकांचे आगार आहे,’ असे सांगत राज्यभरातील हजारो शेतकरी रविवारी (ता.१८) कुटुंबासमवेत विविध पिकांची पाहणी करताना दिसले.

माळेगावच्या विस्तीर्ण शिवारात उभारलेल्या या प्रदर्शनात पीक व्यवस्थापन, माती परीक्षणावर आधारित खत वापर, ठिबक व तुषार सिंचन, जैविक शेती, सेंद्रिय निविष्ठा, आधुनिक बियाणे व कीड-रोग व्यवस्थापन यांचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखविण्यात येत आहे. “पाहिले, समजले आणि लगेच अमलात आणले,” या संकल्पनेवर आधारित या प्लॉट्समुळे शेतकऱ्यांना प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी मिळत आहे, अशी माहिती येथील कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. धीरज शिंदे यांनी दिली.

शेतीची कामे बंद ठेवून उत्सुकतेने अनेक शेतकरी महिला, कृषी तंत्रज्ञानाच्या शोधासाठी गावागावातून युवा शेतकरी कृषिक २०२६ मध्ये दुसऱ्या दिवशीही दाखल होत आहेत. प्रदर्शनाला भेट देण्यासाठी पुणे, सोलापूर, अहिल्यानगर, सातारा, सांगली आदी जिल्ह्यांतील शेतकरी आले होते.

“इथे केवळ माहिती नाही, तर प्रत्यक्ष शेती कशी करावी हे डोळ्यांनी पाहायला मिळते,” अशी प्रतिक्रिया सीताराम निखाळजे (सातारा) यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केली.


कृषी प्रदर्शनामुळे आधुनिक, शाश्वत आणि नफ्याची शेती करण्याचा आत्मविश्वास शेतकऱ्यांमध्ये वाढत आहे. बारामती–माळेगावचे शिवार राज्यातील शेतकऱ्यांसाठी कृषी शिक्षणाचे खुले विद्यापीठ ठरत आहे.
- महंमद शेख (नाशिक)

हायटेक शेती संबंधीची माहिती फायदेशीर
भविष्यातील शेतीसाठी शेतकऱ्यांना नेमके काय हवे आहे ते कृषिकमध्ये पहावयास मिळत असल्याने शेतकरी खूष होत आहेत. यावेळी प्रदर्शनातील विविध स्टॉलवर फिरून अनेक शेतकरी त्यासंबंधीची माहिती आणि त्यांची पत्रके घेत होते. कृषी निविष्ठा, बी-बियाणे, सिंचन सुविधेसह सेंद्रिय शेती व हायटेक शेती संबंधीची माहिती खूपच फायदेशीर ठरल्याचे कोल्हापूरच्या शेतकऱ्यांनी बोलून दाखविली.

सेन्सर तंत्रज्ञानाची भूरळ
सध्या एआय कॉम्प्युटर व्हीजन आणि मशिन लर्निंगद्वारे कॅमेरा व सेंसरचा वापर करून अचूकरीत्या लेझरच्या सहाय्याने तन मारणाऱ्या मशिनचा यशस्वी प्रयोग कृषिकमध्ये शेतकऱ्यांना पाहावयास मिळाला. रोबोटिक म्हणजे सेन्सरचा वापर करून स्वतः पूर्णपणे स्वयंचलित, ड्रायव्हर विना ट्रॅक्टर पेरणी करू शकतो. यासाठी फक्त मशिनला शेताचा नकाशा काढून दिल्यावर तो ट्रॅक्टर स्वतः ड्रायव्हरविना चालतो. याशिवाय स्वयंचलित पाणी तसेच खत व्यवस्थापन यंत्रणा शेतकऱ्यांना पहावसाय मिळत आहे.


03053

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com