कृषि विस्तारकार्याला अधिक गतिमान करा

कृषि विस्तारकार्याला अधिक गतिमान करा
Published on

कृषी विस्तारकार्याला अधिक गतिमान करा
--
कुलगुरू डॉ. इन्द्र मणि; ‘केव्हीके’च्या सल्लागार समितीची बैठक
--
ॲग्रोवन वृत्तसेवा

खामगाव, जि. बीड : शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी आधुनिक कृषी तंत्रज्ञान, संशोधनाचे निष्कर्ष आणि शेतकरीकेंद्रित विस्तार उपक्रम प्रभावीपणे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे. कृषी विज्ञान केंद्रांनी प्रयोग, प्रात्यक्षिके आणि प्रशिक्षणांच्या माध्यमातून कृषी विस्तारकार्य अधिक गतिमान करावे, अशी सूचना वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. इन्द्र मणि यांनी केली.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत खामगाव (ता. गेवराई) येथील कृषी विज्ञान केंद्रात रविवारी (ता. ९) आयोजित दहाव्या वैज्ञानिक सल्लागार समितीच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.

विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार, पुणे येथील ‘अटारी’चे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. शाकिर अली, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुभाष साळवे, कृषी विद्यावेत्ता प्रा. अरुण गुट्टे, छत्रपती संभाजीनगर येथील कृषी विज्ञान केंद्राच्या कार्यक्रम समन्वयक डॉ. दीप्ती पाटगावकर तसेच खामगाव कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ. हनुमान गरुड उपस्थित होते.

बैठकीपूर्वी कृषी विज्ञान केंद्रात नव्याने सुरू करण्यात आलेल्या जैविक निविष्ठा निर्मिती युनिटचे उद्घाटन कुलगुरू डॉ. मणि यांच्या हस्ते करण्यात आले.

जैविक निविष्ठांचा वापर वाढल्यास रासायनिक निविष्ठांवरील खर्च कमी होऊन उत्पादन खर्चात बचत होईल. त्यातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल. कृषी विद्यापीठाच्या विविध उपक्रमांमध्ये शेतकऱ्यांनी सक्रिय सहभाग घ्यावा. कृषी विज्ञान केंद्रातील प्रयोगांचे निष्कर्ष अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावेत. आधुनिक आणि प्रगत कृषी तंत्रज्ञानाची प्रात्यक्षिके शेतकऱ्यांच्या शेतावर प्रभावीपणे राबवावीत, असे डॉ. मणि यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. गरुड यांनी केले. त्यांनी कृषी विज्ञान केंद्रामार्फत राबविण्यात येणारे संशोधन, प्रात्यक्षिके, प्रशिक्षण आणि विस्तारकार्याची माहिती वैज्ञानिक सल्लागार समितीसमोर मांडली.

या वेळी कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञांनी तयार केलेल्या ‘नैसर्गिक शेती - काळाची गरज’, ‘रेशीम किटकावरील उझी माशीचे व्यवस्थापन’, ‘ज्वारी लागवडीचे आधुनिक तंत्रज्ञान’ आणि ‘जनावरांमधील लंपी स्कीन रोगाचे व्यवस्थापन’ या घडीपत्रिकांचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. कृषी विज्ञान केंद्राशी संलग्न पुरस्कारप्राप्त शेतकरी रवी दाभाडे, बाबू कोकाट, अशोक पठाडे आणि वनमाला बोरकर यांचा सत्कार करण्यात आला.

बैठकीला माजलगावच्या उपविभागीय कृषी अधिकारी श्रद्धा भवारी, गेवराईचे तालुका कृषी अधिकारी सचिन गिरी, मंडळ कृषी अधिकारी सतीश केसभट, उद्यानपंडित राजेंद्र आतकरे यांच्यासह समिती सदस्य, प्रगतिशील शेतकरी तसेच विविध संस्था आणि शासकीय विभागांचे प्रतिनिधी उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. भैयासाहेब गायकवाड यांनी केले. डॉ. तुकेश सूरपाम यांनी आभार मानले.
--
फोटो ओळ ः
खामगाव, ता. गेवराई : कृषी विज्ञान केंद्रातील जैविक निविष्ठा निर्मिती युनिटच्या उद्घाटनप्रसंगी कुलगुरू डॉ. इन्द्र मणि, डॉ. राकेश अहिरे, डॉ. भगवान आसेवार, डॉ. शाकिर अली, सुभाष साळवे, प्रा. अरुण गुट्टे, डॉ. दीप्ती पाटगावकर, डॉ. हनुमान गरुड आदी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com