agn Kiran Jadhav ACB followup 04112026_txt.txt

agn Kiran Jadhav ACB followup 04112026_txt.txt
Published on: 

कृषी उपसंचालकाकडे
१२८ टक्के जादा संपत्ती

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चौकशी अहवालात नोंद

ॲग्रोवन वृत्तसेवा
पुणे : वादग्रस्त कृषी उपसंचालक किरण जाधव यांच्याकडे ज्ञात स्त्रोताच्या उत्पन्नापेक्षाही १२८ टक्के जादा संपत्ती आहे. यात शेतजमीन, फ्लॅट, दागिन्यांचाही समावेश आहे. तसा अहवाल पोलिस महासंचालकांना देण्यात आल्यानंतर जाधव यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले, असे पोलिसांच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या कागदपत्रांमध्ये जाधव दांपत्याची कुंडलीच देण्यात आली आहे. किरण जाधव व त्यांची पत्नी संगिता जाधव यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्याची बुधवारी (ता. ४) कृषी आयुक्तालयात चर्चा होती. ‘जाधव यांच्याविरोधात मूळ तक्रार आमदार सुरेश धस यांनी राज्य शासनाकडे केली होती. ही तक्रार गृह विभागाच्या सहसचिवांकडे गेली. तसेच, कृषी आयुक्तालयानेदेखील जाधव यांची चौकशी केली होती. धस यांची तक्रार व कृषी आयुक्तालयातील चौकशी अहवाल, असे दोन्ही मुद्दे विचारात घेत लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या महासंचालकांनी सखोल चौकशीचे आदेश दिले. त्यानंतर जाधव यांच्यासह त्यांच्या कुटुंबाचे जबाब घेण्यात आले,’ असेही अहवालात म्हटले आहे.
जाधव हे मूळचे सातारा जिल्ह्यातील दहीवडी (ता. माण) गावचे आहेत. ते पुणे कृषी महाविद्यालयाचे कृषी पदवीधर असून त्यांचे पदव्युत्तर शिक्षण दापोलीच्या डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात झाले. १९९४ मध्ये ते कृषी अधिकारी झाले. त्यांनी मंडळ कृषी अधिकारी (खंडाळा व म्हसवड कार्यालय), विभागीय गुणवत्ता नियंत्रक निरीक्षक म्हणून ठाणे विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयात, तंत्र अधिकारी म्हणून कृषी आयुक्तालयाच्या निविष्ठा व गुणनियंत्रण संचालक कार्यालयात, सहायक संचालक म्हणून पुणे रामेती, तंत्र अधिकारी म्हणून मृद संधारण संचालकांकडे तसेच उपसंचालक म्हणून दक्षता पथकात व सोलापूर आत्मा येथे प्रकल्प उपसंचालक म्हणून सेवा बजावली. त्यांना लग्नात ५० तोळे सोने मिळाले. जाधव दांपत्याकडे पगार, शेती, हक्कसोड, पंतसंस्था कर्ज, एलआयसी, एचडीएफसी, ज्ञानदिप पंतसंस्था गृहकर्ज, एचडीएफसी बँक कर्ज, एलआयसी मनी बॅक पॉलिसी, कार विक्री, आवर्ती ठेव योजना, सदनिका भाडे, शेअर्स लाभांश, घर बांधणी अॅग्रीम, बँकेचे व्याज यातून तीन कोटी ४० लाख रुपये उत्पन्न मिळाले आहे. तसेच, त्यांनी केलेला खर्च तीन कोटी ५५ लाख रुपये इतका आहे, असे अहवालात म्हटले आहे.
जाधव दांपत्याचे उत्पन्न विचारात घेतल्यास त्यांच्याकडे उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता आढळते. शेतजमिनी, फ्लॅट्स, प्लॉट्स, मोबाईल खरेदी, पतपेढी शेअर्स मोटार सायकल, घरातील फर्निचर, इलेक्ट्रॉनिक वस्तू, संगणक खरेदी, बँक खात्यावरील अखेर शिल्लक अशी एकूण चार कोटी २२ लाखाची मालमत्ता त्यांची आहे. उत्पन्नापेक्षाही १२८ टक्के बेहिशेबी मालमत्ता त्यांची आहे, अशी नोंद राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महासंचालकांना दिलेल्या अंतिम अहवालात करण्यात आली आहे.

चौकट ----

मालमत्तेचे स्त्रोत तपासण्याची शक्यता
जाधव दांपत्याविरोधात आता फौजदारी गुन्हा दाखल झालेला आहे. त्यांच्या बेहिशेबी मालमत्तेचे मूळ स्त्रोत आता तपासले जातील. कृषी विभागाच्या कामकाजातून त्यांनी अवैध पैसा गोळा केला का, यात त्यांनी कोणाला वाटेकरी केले, या पैसा कोणाकडून येत होता याचीही तपास होऊ शकतो, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.