

बंधाऱ्याच्या देयकासाठी
कृषी सहायकाने घेतली लाच
वर्धा एसीबीच्या कारवाईने कृषी विभागातील भ्रष्टाचार चव्हाट्यावर
ॲग्रोवन वृत्तसेवा
चंद्रपूर : बंधाऱ्याच्या बांधकामाचे देयक मंजूर करण्यासाठी ५५ हजार रुपयांची लाच मागून त्यापैकी ४० हजार रुपये स्वीकारणाऱ्या कोरपना तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील कृषी सहायकाला वर्धा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने अटक केली. या कारवाईमुळे कृषी विभागातील भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. हरी विठ्ठलराव उदगीरे (वय ३५) असे लाचखोर कृषी सहायकाचे नाव आहे.
या प्रकरणातील ४६ वर्षीय तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार केली होती. त्यानुसार, बंधाऱ्याच्या बांधकामाचे देयक मंजूर करण्यासाठी उदगीरे याने ५५ हजार रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे. तडजोडीनंतर ४० हजार रुपये तत्काळ आणि उर्वरित रक्कम दुसऱ्या दिवशी देण्याचे ठरले होते. तक्रारीच्या अनुषंगाने शासकीय पंचांच्या उपस्थितीत लाचेच्या मागणीची पडताळणी करण्यात आली. त्यानंतर वर्धा एसीबीच्या पथकाने सापळा रचला. ठरल्याप्रमाणे तक्रारदाराकडून ५०० रुपयांच्या ८० नोटांच्या स्वरूपात ४० हजार रुपये स्वीकारताच पथकाने लाचखोर कृषी सहायकाला ताब्यात घेतले. त्याच्या झडतीत मोबाइल आणि ५९५ रुपये रोख आढळले. मोबाइल जप्त करण्यात आला असून, गडचांदूर येथील शिक्षक कॉलनीतील त्याच्या निवासस्थानी झडतीची कार्यवाहीही सुरू करण्यात आली होती. या प्रकरणी गडचांदूर येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करण्यात आली. वर्धा एसीबीचे पोलिस उपअधीक्षक राकेश साखरकर यांच्या निर्देशानुसार, पोलिस निरीक्षक संदीप मुपडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली. पुढील तपास चंद्रपूर एसीबीचे पोलिस निरीक्षक केदार करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.