

कृषी विभागाच्या बनावट
लेटरपॅड प्रकरणी तक्रार दाखल
बोगस भरतीचे पत्र; आर्थिक फसवणुकीची शक्यता
ॲग्रोवन वृत्तसेवा
अमरावती : ‘कृषी मित्र’च्या नावाखाली यापूर्वी कृषी विभागातील बोगस भरतीचे प्रकरण समोर आले असतानाच आता अमरावती विभागातही बनावट भरती पत्राचा प्रकार उघडकीस आला आहे. विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाच्या बनावट लेटरपॅडवर लिपिक संवर्गातील पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. उमेदवारांची आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता लक्षात घेऊन कृषी विभागाने गाडगेनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
अमरावती विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाच्या नावाने तयार करण्यात आलेल्या या पत्रात सरळसेवेने लिपिक वर्ग-तीन संवर्गातील रिक्त पदे भरण्यात येणार असल्याचे नमूद आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, अमरावती या कार्यालयात संबंधित उमेदवारांची नियुक्ती केली जाणार असल्याचा उल्लेखही पत्रात करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, ही भरती प्रक्रिया ऑनलाइनऐवजी ऑफलाइन पद्धतीने होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. इच्छुक उमेदवारांनी १० नोव्हेंबरपर्यंत प्रत्यक्ष कार्यालयात अर्ज सादर करावेत, असे पत्रात नमूद आहे. त्यासाठी नुकतेच आरेखक पदावरून सेवानिवृत्त झालेले वीरेंद्र भोयर यांच्याशी संपर्क साधण्यास सांगण्यात आले आहे. या पत्रावर तत्कालीन विभागीय कृषी सहसंचालक तथा सेवानिवृत्त अधिकारी सुभाष नागरे यांची स्वाक्षरीही आहे. त्यामुळे प्रथमदर्शनी अधिकृत भरती प्रक्रिया असल्याचा समज होऊन बेरोजगार तरुणांची फसवणूक होण्याची शक्यता आहे.
कोट ----
बनावट लेटरपॅडचा वापर करून भरतीच्या नावाखाली आर्थिक व्यवहार होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर तत्काळ पोलिसांकडे तक्रार करण्यात आली. या प्रकाराची चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल असे पोलिसांनी सांगत हे प्रकरण चौकशीत ठेवले आहे.
- गणेश घोरपडे,
विभागीय कृषी सहसंचालक, अमरावती
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.