

कृषी विभाग वाटणार ३.२५ कोटींचे शेती साहित्य
कृषी सभापती चिवडशेट्टी; आणखी दीड कोटी निधीची मागणी करणार
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. १२ : जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन समितीच्या बैठकीत ३ कोटी २५ लाख रुपयांच्या कृषी साहित्य खरेदीस मंजुरी देण्यात आली असून, अतिरिक्त दीड कोटी रुपयांची मागणी करणार असल्याचे कृषी व पशुसंवर्धन सभापती रामप्पा चिवडशेट्टी यांनी सांगितले. बैठकीत जिल्हा परिषद सेस योजना व योजनेत्तरअंतर्गत प्राप्त झालेल्या प्रस्तावांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. शेतकरी व पशुपालकांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेता, सर्व घटकांपर्यंत योजनांचा लाभ पोचवण्यासाठी अतिरिक्त दीड कोटी रुपयांच्या निधीची मागणी करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला.
शेतकऱ्यांना आधुनिक शेतीची औजारे व सिंचन साधने उपलब्ध करून देण्यासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. त्यामध्ये पीक संरक्षण औजारे व उपकरणे खरेदीसाठी २० लाख, ट्रॅक्टरचलित औजारे, रोटावेटर, पलटी नांगर खरेदीसाठी १.५५ कोटी, ५ एच.पी. सबमर्सिबल पंप संच व डिझेल इंजिन खरेदीसाठी ७५ लाख, कडबाकुट्टी मशीन, ताडपत्री, स्लरी फिल्टर खरेदीसाठी १ कोटी ५५ लाख, असे एकूण कृषी साहित्य व उपकरणांसाठी ३ कोटी २५ लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.
दूध काढणी मशीन वाटप होणार
ग्रामीण भागातील पशुपालकांना आणि महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी ‘४ प्लस १’ शेळी गट वाटप योजनेसाठी ३० लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच दुग्ध व्यवसाय आधुनिक व सुलभ करण्यासाठी दूध काढणी मशीन वाटपाकरिता २० लाखांची तरतूद करण्यात आली आहे. जनावरांसाठी पौष्टिक चारा उपलब्ध राहावा व मुरघास निर्मितीला प्रोत्साहन मिळावे म्हणून १० लाखांचा निधी मंजूर करण्यात आल्याचे सभापती चिवडशेट्टी यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.