
पुणे - पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने (पीडीसीसी) (PDCC) चालू वर्षीच्या खरीप हंगामात आतापर्यंत जिल्ह्यातील सुमारे १ लाख ९२ हजार ९५८ शेतकऱ्यांना (Farmer) तीन लाख रुपयांपर्यंतचे पीककर्ज शून्य टक्के व्याजाने वितरित केले आहे. यानुसार या सर्व शेतकऱ्यांना मिळून एकूण एक हजार ४४४ कोटी ७२ लाख ८६ हजार ८९१ रुपयांचे पीक कर्ज वाटप केले आहे. शून्य टक्के व्याजाने एवढ्या मोठ्या रक्कमेचे वाटप करणारी पुणे ही राज्यातील एकमेव जिल्हा बॅक ठरली आहे. (Agriculture Loan of Rupees 1500 Crore at Zero Percent Interest in Pune District)
मागील पंधरा वर्षापासून पुणे जिल्हा बॅंकेच्यावतीने शेतकऱ्यांना तीन लाख रुपयांपर्यंतचे पीककर्ज शून्य टक्के व्याजाने वितरित केले जात आहे. त्यानंतर सातारा जिल्हा बॅंकेनेही पुणे जिल्हा बॅंकेच्या पावलावर पाऊल ठेवत, हाच उपक्रम मागील दहा वर्षांपासून सुरु केला आहे. पुणे आणि सातारा या दोन जिल्ह्यात शून्य टक्के व्याजाचा हा प्रयोग यशस्वी झाल्याचे पाहून, राज्य सरकारने चालू वर्षीच्या खरीप हंगामापासून राज्यभर कर्ज वाटपाचा हा ‘पॅटर्न’ सुरू केला आहे.
तीन लाखांहून अधिक पीककर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांची संख्या केवळ २ हजार ७०१ इतकी आहे. या सर्व शेतकऱ्यांना मिळून ८८ कोटी ४७ लाख २८ हजार ९०० रुपयांचे पीककर्ज वाटप केले आहे. तीन लाखांपेक्षा अधिक रक्कमेचे पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना नियमानुसार व्याज आकारले जाणार असल्याचे जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांनी सांगितले.
आतापर्यंत पुणे जिल्ह्यातील एकूण १ लाख ९५ हजार ६०० शेतकऱ्यांना खरीप हंगामातील पिकांसाठी कर्ज देण्यात आले आहे. या सर्व शेतकऱ्यांना मिळून आतापर्यंत एकूण १ हजार ५३३ कोटी २० लाख १५ हजार ७९१ रुपयांचे पीक कर्ज वाटप केले आहे. सुमारे सव्वादोन लाख हेक्टर क्षेत्रासाठी हे कर्ज वाटप झाले आहे. जिल्हा बँकेने (पीडीसीसी) गतवर्षी जून २०२० अखेरपर्यंत १ लाख ३६ हजार ६६२ शेतकऱ्यांना एक हजार ५४ कोटी ३८ लाख ३५ हजार रुपयांचे कर्ज वाटप केले होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कर्जाचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे.
जिल्हा बॅक मागील पंधरा वर्षांपासून दरवर्षी खरीप व रब्बी हंगामात मिळून दीड हजार कोटी रुपयांचे पीककर्ज शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजाने वाटप करत आहे. या उपक्रमांतर्गत मागेल त्या पात्र शेतकऱ्याला लाभ दिला जात आहे. कर्जाची मागणी केलेला एकही शेतकरी पीक कर्जाच्या लाभापासून वंचित राहणार नाही, याची खबरदारी जिल्हा बॅक सातत्याने घेत आहे. जिल्ह्यातील इच्छुक आणि पात्र शेतकऱ्यांना यापुढेही येत्या ३० सप्टेंबरपर्यंत खरीप पिकांसाठी कर्ज वाटप केले जाणार आहे.
- रमेश थोरात, अध्यक्ष, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, पुणे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.