यांत्रिक पद्धतीने भात लागवडीस शेतकऱ्यांची पसंती; कमी खर्चात दुप्पट उत्पन्न

पश्चिम हवेली व वेल्हे तालुक्यात दोनशे एकर क्षेत्रावर लागवड
agriculture news farmers mechanized rice cultivation income at low cost
agriculture news farmers mechanized rice cultivation income at low cost sakal

सिंहगड: पारंपारिक पद्धतीने भात लागवड करण्यासाठी मजूरांचा अभाव, वाढलेले मजुरीचे दर, खत व बियाण्याचा खर्च, लागवडीसाठी लागणारा वेळ व त्या तुलनेत कमी प्रमाणात मिळणारे उत्पन्न यामुळे पश्चिम हवेली व वेल्हे तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी पारंपारिक पद्धतीने भात लागवड न करता यांत्रिक पद्धतीने भात लागवड करण्यास पसंती दिली आहे. कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार यावर्षी पश्चिम हवेली व वेल्हे तालुक्यात मिळून दोनशे एकरपेक्षा जास्त क्षेत्रावर यांत्रिक पद्धतीने भात लागवड करण्याचे नियोजन आहे तर पुढील वर्षी चारशे एकरचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे.

यांत्रिक पद्धतीने भात लागवड करण्यासाठी पारंपारिक पद्धतीपेक्षा अत्यंत कमी खर्च येतो. तसेच वेळ व बियाण्याची बचत होते. तसेच कमी दिवसांच्या रोपांची लागवड करण्यात येत असल्याने रोपे चांगल्या प्रकारे रुजून फुटव्यांची संख्या वाढते. परिणामी यांत्रिक पद्धतीने भात लागवड करण्यात आल्यानंतर मिळणाऱ्या उत्पन्नातही दुपटीपेक्षा जास्त वाढ होत असल्याचे कृषी विभागाच्या अभ्यासातून स्पष्ट झाल्याचे वेल्हे तालुका कृषी अधिकारी धनंजय कोंढाळकर यांनी सांगितले.

पारंपारिक पद्धत / यांत्रिक पद्धत (एक एकराची आकडेवारी)

  • मजुरांची संख्या- 30/3

  • मजुरी खर्च- 20,000/4000(यंत्रासह)

  • लागवडीसाठी वेळ-2ते 3 दिवस/3तास

  • बियाणे-60 किलो/16 किलो

  • खतांचा खर्च-4000 रुपये/1600 रुपये

  • उत्पन्न- 18 ते 20 क्विंटल/35 ते 40 क्विंटल

कृषी अधिकाऱ्यांचे भर पावसात मार्गदर्शन.......... पुणे-पानशेत रस्त्याला लागून असलेल्या निगडे (ता.वेल्हे) या गावातील रामभाऊ कडू या शेतकऱ्याच्या शेतात यांत्रिक पद्धतीने भात लागवड सुरू असताना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बोटे व तालुका कृषी अधिकारी धनंजय कोंढाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी पर्यवेक्षक अशोक राठोड, कृषी सहाय्यक हेमंत पवार, नरेंद्र देवरे व मोहन ओतारे हे भर पावसात प्रत्यक्ष शेतात उभे राहून मार्गदर्शन करत होते. शेतकऱ्यांनीही कृषी विभागाच्या सहकार्याबद्दल समाधान व्यक्त केले.

" मागील वर्षी आम्ही कृषी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली यंत्राने भात लागवड केली होती. अत्यंत कमी खर्चात आम्हाला दरवर्षी पेक्षा दुप्पट उत्पन्न मिळाले. दरवर्षी मजुरांसाठी गावोगावी फिरावे लागायचे ते आता बंद झाले. आमचा अनुभव पाहून परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी यावर्षी अशीच भात लागवड करण्याचे नियोजन केलेले आहे."

- बायडाबाई रामभाऊ कडू, शेतकरी, निगडे (ता.वेल्हे)

"यांत्रिक पद्धतीने भात लागवड करण्याकडे शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी दरवर्षी शिबीराचे आयोजन करण्यात येते. पारंपारिक व यांत्रिक पद्धतीने भात लागवड यातील तफावत आम्ही पटवून सांगितल्यानंतर यावर्षी सुमारे दोनशे एकरपेक्षा जास्त लागवड यांत्रिक पद्धतीने होत आहे. पुढील वर्षी हा आकडा चारशे एकरांच्या पुढे असेल."

- अशोक राठोड, कृषी पर्यवेक्षक, पाबे (ता. वेल्हे)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com