
काटेवाडी : मे महिन्यात मुसळधार पडलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील ऊस पिकावर हुमणी अळीचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. हुमणी भुंगेरांनी घातलेल्या अंड्यांमधून आता अळ्या बाहेर येत आहेत. नव्याने केलेल्या आडसाली ऊस लागवडीवर याचा गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. अळी पिकांच्या मुळांना खात असल्याने पिके वाळतात. ज्यामुळे शेतकऱ्यांना पुनर्लागवड करावी लागते. आणि आर्थिक नुकसान होते. यंदा हुमणीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी वेळीच प्रभावी उपाययोजना करावी, असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात येत आहे.