

फलोत्पादनासाठी एससी, एसटी शेतकऱ्यांना अनुदान
जिल्ह्यात १३७.४० लाखांचा निधी मंजूर; विविध घटकांसाठी महाडीबीटीवर अर्ज करण्याचे आवाहन
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. ७ : एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान २०२६-२७ अंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी १३७.४० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यामध्ये अनुसूचित जाती प्रवर्गासाठी १२०.१५ लाख, तर अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी १७.२५ लाख रुपयांचा समावेश आहे. पात्र शेतकऱ्यांनी विविध घटकांच्या अनुदानासाठी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांनी केले आहे.
या अभियानात ड्रॅगन फ्रूट लागवड, तण नियंत्रणासाठी आच्छादन (वीडमॅट), सुटी फुले, मसाला पिके, मानांकन रोपवाटिका, स्ट्रॉबेरी लागवड, हरितगृह, शेडनेट हाऊस, प्लास्टिक मल्चिंग, मधुमक्षिका वसाहत, २० एच.पी. क्षमतेपर्यंतचे ट्रॅक्टर व आठ एच.पी.पेक्षा अधिक क्षमतेचे पॉवर टिलर यांसाठी अनुदान मिळणार आहे.
तसेच फार्मगेट पॅक हाऊस, प्राथमिक प्रक्रिया केंद्र, एकात्मिक शीतसाखळी, कांदाचाळ, सामूहिक शेततळे आणि शेततळ्याचे अस्तरीकरण या घटकांचाही समावेश आहे.
---------------------------------
औषधी अन् सुगंधी वनस्पतींच्या लागवडीलाही प्रोत्साहन
औषधी वनस्पतींच्या लागवडीसाठी मुलेठी, शतावरी, कालीहारी, सफेद मुसळी, गुग्गुळ, मंजिष्ठा, कुटकी, अतीस, जटामांसी, अश्वगंधा, ब्राह्मी, तुळस, विदारीकंद, चिरायता आणि पुष्करमूळ आदी पिकांना लाभ मिळणार आहे. गुलाब, रोझमेरी, निशिगंध, जिरेनियम, कॅमोमाईल, चंदन, दावना, जाई आणि लॅव्हेंडर या महाग औषधी व सुगंधी वनस्पतींसह पामारोसा, गवती चहा, व्हेटिव्हर, जावा सिट्रोनेला व गोड तुळशीपत्र यांचाही समावेश आहे.
---------------------------------
लाभार्थी निवडीचे निकष
योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांच्या स्वतःच्या नावे शेतजमीन असणे आवश्यक आहे. तसेच त्यांच्या शेतात फळे, भाजीपाला, फुले किंवा इतर फलोत्पादन पिकांची लागवड असावी. या अटी पूर्ण करणाऱ्या अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांनी महाडीबीटीच्या https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करावेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.