पुणे - ॲग्रो लॉजिस्टिक पार्क : कृषी पणन क्षेत्रासाठी भविष्यातील नवी दिशा

पुणे - ॲग्रो लॉजिस्टिक पार्क : कृषी पणन क्षेत्रासाठी भविष्यातील नवी दिशा
Published on: 

पान १२ - ६ साठी
०००००००००००००००००००
ॲग्रो लॉजिस्टिक पार्क : कृषी पणन क्षेत्रासाठी भविष्यातील नवी दिशा
------------------------------------------
बदलत्या कृषी पणन व्यवस्थेच्या गरजा लक्षात घेता केवळ पारंपरिक गोदाम सुविधांपुरते मर्यादित न राहता शेतीमालाची शास्त्रशुद्ध साठवणूक, स्वच्छता, प्रतवारी, पॅकिंग, प्राथमिक प्रक्रिया, गुणवत्ता तपासणी, वाहतूक, वितरण आणि विपणन या सर्व सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणाऱ्या ‘ॲग्रो लॉजिस्टिक पार्क’ची उभारणी महत्त्वाची आहे.
--------------------------------------
कौस्तुभ दिवेगांवकर, दीपक शिंदे
------------------------------------------
भाग ः १
-----------------
महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्रामध्ये उत्पादनवाढीबरोबरच शेतमालाची सुरक्षित साठवणूक, गुणवत्ता सुधारणा, मूल्यवर्धन आणि बाजारपेठेशी प्रभावी जोडणी निर्माण करणे अत्यंत आवश्यक झाले आहे. राज्यात तृणधान्ये, कडधान्ये, तेलबिया, कापूस, सोयाबीन, तूर, हरभरा तसेच विविध फळे आणि भाजीपाला यांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होते. मात्र अपुऱ्या साठवणूक व प्रक्रिया सुविधा, हंगामातील मोठ्या प्रमाणावरील आवक आणि वाढता वाहतूक खर्च यांमुळे अनेकदा शेतकऱ्यांना अपेक्षित बाजारभाव मिळत नाही. महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ राज्यातील तृणधान्ये, कडधान्ये, तेलबिया, कापूस व इतर कृषी उत्पादनांच्या शास्त्रशुद्ध व सुरक्षित साठवणुकीमध्ये सातत्याने महत्त्वाची भूमिका बजावत असून, शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपन्या, व्यापारी, सहकारी संस्था आणि विविध शासकीय यंत्रणांना गोदाम सुविधा उपलब्ध करून देत आहे. तसेच शेतीमालाची गुणवत्ता टिकविणे, साठवणुकीदरम्यान होणारे नुकसान कमी करणे आणि गोदाम पावतीच्या आधारे तारण कर्जाची सुविधा उपलब्ध होण्यास मदत करणे या माध्यमातून वखार महामंडळ कृषी अर्थव्यवस्थेला बळकटी देत आहे.

आधुनिक साठवणूक आणि मूल्यवर्धनाच्या सुविधांची गरज ः
शेतीमालाची योग्य पद्धतीने साठवणूक केल्यास त्याची गुणवत्ता टिकविणे, वजनातील घट कमी करणे आणि बाजारातील मागणीनुसार विक्रीचे नियोजन करणे शक्य होते. त्याचबरोबर शेतमालाची स्वच्छता, प्रतवारी, वाळवण, पॅकिंग आणि प्राथमिक प्रक्रिया केल्यास बाजारपेठेतील स्वीकारार्हता वाढू शकते. उदा. सोयाबीनमधील अशुद्ध घटक वेगळे करून योग्य आर्द्रतेपर्यंत वाळवण केल्यास साठवणुकीची गुणवत्ता सुधारते. तूर व हरभऱ्यासारख्या कडधान्यांवर प्राथमिक प्रक्रिया करून त्यांचे मूल्यवर्धन करता येते. कापसाच्या बाबतीत जिनिंग, प्रेसिंग करून कापूस गाठींची सुरक्षित साठवणूक महत्त्वाची असते. अनेक शेतकरी उत्पादक कंपन्यांकडे शेतीमाल संकलनाची क्षमता असली, तरी स्वतःची मोठी गोदामे, प्रक्रिया यंत्रणा किंवा आधुनिक वाहतूक व्यवस्था उभारण्यासाठी आवश्यक भांडवल उपलब्ध नसते. सामाईक वापराच्या कृषी लॉजिस्टिक सुविधांमुळे अशा संस्थांना कमी भांडवली गुंतवणुकीत आधुनिक सेवांचा लाभ घेता येऊ शकतो. याच पार्श्वभूमीवर ‘ॲग्रो लॉजिस्टिक पार्क’ ही संकल्पना कृषी पणन क्षेत्राच्या भविष्यासाठी महत्त्वाची ठरते.

‘ॲग्रो लॉजिस्टिक पार्क’ संकल्पना ः
ॲग्रो लॉजिस्टिक पार्क म्हणजे केवळ मोठ्या क्षमतेचे गोदाम किंवा मालवाहतुकीचे केंद्र नव्हे. शेतीमाल काढणीनंतर आवश्यक असलेल्या विविध सेवा आणि पायाभूत सुविधा एकाच परिसरात उपलब्ध करून देणारी ही एकात्मिक व्यवस्था आहे. ‘ॲग्रो लॉजिस्टिक पार्क’मध्ये आधुनिक गोदामे आणि सायलो साठवणूक प्रणालीमध्ये शेतीमाल साठवणुकीबरोबरच शेतीमाल संकलन, स्वच्छता व प्रतवारी केंद्र, वाळवण सुविधा, प्राथमिक प्रक्रिया केंद्र, गुणवत्ता तपासणी प्रयोगशाळा, इलेक्ट्रॉनिक वजनकाटे, वाहतूक व ट्रक टर्मिनल, बँकिंग व विमा सुविधा, ई-ट्रेडिंग, शेतीमाल तारण कर्ज इ. सेवा सुविधा उपलब्ध करून देण्याचा उद्देश असतो. यामुळे शेतकरी उत्पादक कंपन्या, व्यापारी, प्रक्रिया उद्योग, निर्यातदार आणि वित्तीय संस्था यांना परस्परपूरक पद्धतीने जोडणे शक्य होते व त्यांच्यामध्ये अधिक प्रभावी समन्वय निर्माण होण्यास मदत होते.

समृद्धी महामार्ग : कृषी व्यापारासाठी नवी संधी
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा नागपूर आणि मुंबईला जोडणारा ७०१ किलोमीटर लांबीचा महत्त्वपूर्ण प्रकल्प असून, यामुळे विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील कृषी उत्पादनांना प्रमुख बाजारपेठा, प्रक्रिया उद्योग आणि निर्यात केंद्रांशी जोडण्याच्या नव्या संधी निर्माण झाल्या आहेत. विशेषतः कापूस, सोयाबीन, तूर, हरभरा, इतर कडधान्ये व तेलबिया यांच्या वाहतूक आणि व्यापाराला चालना मिळण्याची मोठी क्षमता या महामार्गात आहे.
या संधींचा कृषी उत्पादन क्षेत्राला प्रत्यक्ष लाभ मिळण्यासाठी महामार्गालगत आधुनिक साठवणूक, शेतीमाल स्वच्छता व प्रतवारी, प्राथमिक प्रक्रिया, शेतीमाल एकत्रीकरण, मूल्यवर्धन आणि वितरणाच्या एकात्मिक सुविधा विकसित करणे आवश्यक आहे. ही गरज लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाने समृद्धी महामार्गालगत ‘ॲग्रो लॉजिस्टिक पार्क’ विकसित करण्याची संकल्पना पुढे आणली असून, या माध्यमातून शेतीमालाची सुरक्षित साठवणूक, गुणवत्तावाढ, वाहतूक खर्चात बचत, बाजारपेठेशी प्रभावी जोडणी आणि शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचा योग्य मोबदला मिळण्यास मदत होऊन राज्याच्या कृषी पणन व्यवस्थेच्या आधुनिकीकरणाला चालना मिळू शकेल.

व्यवहार्यता अभ्यासातून योग्य ठिकाणांची निवड ः
महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाने जागतिक बँकेच्या अर्थसाह्याने राबविण्यात येणाऱ्या मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पांतर्गत समृद्धी महामार्गालगत ‘ॲग्रो लॉजिस्टिक पार्क’ विकसित करण्यासाठी प्राइस वॉटर हाऊस कूपर्स (PwC) या सल्लागार संस्थेमार्फत व्यवहार्यता अभ्यास केला. या अभ्यासात महामार्गालगतच्या नऊ आर्थिक विकास केंद्रांमधील पीकपद्धती, कृषी उत्पादन, बाजारपेठेतील आवक, उपलब्ध साठवणूक क्षमता, प्रक्रिया उद्योग, वाहतूक सुविधा आणि भविष्यातील कृषी व्यापाराच्या संधींचे विश्लेषण करण्यात आले. त्याआधारे धामणगाव (अमरावती), कारंजा व मंगरूळपीर परिसर (वाशीम), मेहकर (बुलडाणा) आणि सावळी विहीर (अहिल्यानगर) अशा पाच ठिकाणांची निवड करण्यात आली. त्यापैकी वाशीम जिल्ह्यातील इराळा (ता. मालेगाव) आणि शहा (ता. कारंजा) या ठिकाणांचा पुढील प्रकल्प नियोजनात समावेश करण्यात आला. स्थानिक पीकपद्धती, शेतकऱ्यांच्या गरजा, बाजारपेठेची क्षमता आणि उपलब्ध पायाभूत सुविधा लक्षात घेऊन प्रत्येक ठिकाणी आवश्यकतेनुसार कृषी साठवणूक, प्रक्रिया व लॉजिस्टिक सुविधा विकसित करणे, हे या अभ्यासाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.
-----------
इन्फो ः
शेतकरी आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांना होणारे लाभ ः
‘ॲग्रो लॉजिस्टिक पार्क’च्या माध्यमातून शेतीमालाची आधुनिक साठवणूक, स्वच्छता, प्रतवारी, प्राथमिक प्रक्रिया, मूल्यवर्धन, वित्तपुरवठा आणि विपणन सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध होऊन शेतकरी व शेतकरी उत्पादक कंपन्यांना पुढील लाभ अपेक्षित आहेत.
१. सुरक्षित साठवणूक : आधुनिक गोदामे व सायलो सुविधांमुळे शेतमालाची गुणवत्ता टिकून साठवणुकीतील नुकसान कमी होण्यास मदत.
२. योग्य बाजारभाव : शेतमालाची तातडीने विक्री करण्याऐवजी बाजारस्थितीनुसार योग्य वेळी विक्री करण्याचा पर्याय उपलब्ध.
३. गुणवत्ता सुधारणा : स्वच्छता, प्रतवारी व वाळवण सुविधांमुळे शेतमालाचा दर्जा सुधारून गुणवत्तेनुसार अधिक चांगला दर मिळण्याची संधी.
४. शेतीमालाचे मूल्यवर्धन : प्राथमिक प्रक्रिया, पॅकिंग व ग्रेडिंग सुविधांमुळे कृषी उत्पादनांचे बाजारमूल्य वाढविण्यास मदत.
५. शेतीमाल तारण कर्ज : गोदाम पावतीच्या आधारे बँकांकडून तारण कर्ज मिळण्याचा पर्याय उपलब्ध होऊन तातडीच्या आर्थिक गरजा भागविण्यास मदत.
६. शेतकरी उत्पादक कंपन्यांचे सक्षमीकरण : सामाईक साठवणूक, प्रक्रिया व विपणन सुविधांमुळे शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या व्यावसायिक क्षमतेत वाढ.
७. सामूहिक कृषी व्यापार : शेतीमालाचे एकत्रित संकलन, प्रतवारी व मोठ्या प्रमाणावर विक्रीमुळे मोठ्या खरेदीदारांशी थेट व्यवहाराची संधी.
८. वाहतूक खर्चात बचत : एकत्रित माल हाताळणी, वाहतूक व वितरण व्यवस्थेमुळे प्रति मेट्रिक टन लॉजिस्टिक खर्च कमी होण्यास मदत.
९. बाजारपेठ विस्तार : स्थानिक, राष्ट्रीय व निर्यात बाजारपेठा आणि कृषी प्रक्रिया उद्योगांशी थेट जोडणी निर्माण होण्याची संधी.
१०. डिजिटल व्यवहार व पारदर्शकता : डिजिटल गोदाम व्यवस्थापन, ई-ट्रेडिंग आणि इलेक्ट्रॉनिक गोदाम पावतीमुळे व्यवहारांची पारदर्शकता व विश्वासार्हता वाढण्यास मदत.
११. वित्तीय व विमा सुविधा : बँकिंग, विमा आणि डिजिटल वित्तीय सेवांच्या उपलब्धतेमुळे शेतकरी व शेतकरी उत्पादक कंपन्यांना आर्थिक व्यवस्थापनाचे अधिक पर्याय.
१२. रोजगार व उद्योजकता : साठवणूक, प्राथमिक प्रक्रिया, पॅकेजिंग, वाहतूक आणि पूरक सेवांमधून स्थानिक रोजगार व कृषी उद्योजकतेला चालना.
---------------------------------------
संपर्क ः
(कौस्तुभ दिवेगावकर हे महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक आहेत. दीपक शिंदे हे सहव्यवस्थापकीय संचालक, तथा सचिव आहेत.)
००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.