
एशियन चॅम्पियनशिप महिला कुस्ती स्पर्धेत अहिल्या शिंदे हिला सुवर्णपदक
इंदापूर - किर्गीजस्थान देशाची राजधानी बिश्केक येथे सुरू असलेल्या महिला आशियाई कुस्ती स्पर्धेत १७ वर्षाखालील ४९ किलो वजनी गटात भारताची महिला कुस्तीपटू अहिल्या शत्रुघ्न शिंदे हिने सुवर्णपदक पटकावले. ती शिरसोडी (ता. इंदापूर ) येथील सुवर्णकन्या असून इंदापूर येथील श्री नारायणदास रामदास हायस्कूलमध्ये शिकत आहे. गेल्या वर्षी तिने राष्ट्रीय पातळीवर दोन सुवर्ण पदके पटकावली होती. सध्या ती हिस्सार -उमरा ( हरियाणा) येथे गुरु हवासिंग आखाड्यात प्रशिक्षक संजय मलिक यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे.
दि. १९ जून २०२२ पासून एशियन चॅम्पियनशिप कुस्ती स्पर्धेला सुरुवात झाली असून दि. २१ जून २०२२ रोजी अहिल्या शिंदे हिने अंतिम फेरीत जपान देशाच्या नात्सुमी मसुडा या कुस्ती गीरास १०:० अशा गुणफरकाने पराभूत करून देशा साठी सुवर्णपदकाची कमाई केली. त्यापुर्वी तिने पहिल्या फेरीत किर्गिजस्तानच्या कुमुशाई झुदान बेकोआ हिला १०:०,दुसऱ्या फेरीत उज्बेकिस्तानच्या संदुगाश जेनबेइवा हिला ४:०, तिसऱ्या फेरीत कोरियाच्या जीन जू कांग हिला १०:० ने तर चौथ्या फेरीमध्ये कझाकिझस्तानच्या औयमगूल एबिलोवा या महिला कुस्तीपटूस १०:० अशा गुणफरकाने पराभूत करून आपली विजयी घोड दौड सुरू ठेवत देशास निर्भळ यश मिळवून दिले.
पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे सदस्य तथा तिचे मार्गदर्शक महेंद्र रेडके म्हणाले, ही स्पर्धा जिंकणारी अहिल्या शिंदे पहिली महाराष्ट्रीयन महिला कुस्तीपटू ठरली असून तिने इंदापूर तालुक्यासह शिरसोडी गावाचे नाव जगभरात उज्ज्वल केले आहे. तिने ऑलिंपिक मध्ये देशास पदक मिळवून देण्यासाठी तिला शुभेच्छा.
राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष संदीप भोंडवे, इंदापूर तालुका शिक्षण मंडळाचे सचिव मुकुंद शहा, कै. पै. रंगनाथ मारकड कुस्ती केंद्राचे प्रमुख एनआयएस कुस्ती कोच मारुती मारकड यांनी अहिल्या शिंदे हिचे या यशाबद्दल अभिनंदन केले आहे.
Web Title: Ahilya Shinde Wins Gold At Asian Championship Womens Wrestling
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..