

‘एआय’ फोटो वापरणे
पंचांचे मानधन वाढविण्यासाठी ठराव मंजूर
जिल्हा ऑलिंपिक असोसिएशनची सभा ः खेळाडूंचा होणार गौरव
सकाळ वृत्तसेवा
अहिल्यानगर, ता. १४ : अहिल्यानगर जिल्ह्यातील क्रीडा चळवळीला नवी ऊर्जा आणि दिशा देणारी जिल्हा ऑलिंपिक असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा वाडिया पार्क क्रीडा संकुल येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. जिल्ह्यातून आलेल्या २९ क्रीडा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत खेळाडूंच्या उज्ज्वल भविष्यासाठी ठोस पावले उचलण्याचा निर्धार व्यक्त केला. मैदानावर घाम गाळणाऱ्या खेळाडूंना न्याय, सन्मान आणि आवश्यक सुविधा मिळाव्यात, यासाठी सभेत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
सभेत उपस्थित सर्व प्रतिनिधींनी एकमुखाने जिल्ह्यातील क्रीडा संस्कृती अधिक बळकट करण्याचा संकल्प व्यक्त केला. खेळाडूंना दर्जेदार सुविधा, योग्य व्यासपीठ आणि सन्मान मिळवून देण्यासाठी सर्व संघटना एकदिलाने काम करतील, असा विश्वास सभेतून व्यक्त करण्यात आला.
राष्ट्रीय खेळाडूंच्या कर्तृत्वाला मानाचा मुजरा
जिल्ह्याचे नाव राष्ट्रीय स्तरावर अभिमानाने उंचावणाऱ्या खेळाडूंना आता विशेष गौरवाने सन्मानित केले जाणार आहे. २०२५-२६ वर्षात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा सत्कार सोहळा १५ जून पूर्वी आयोजित करण्यात येणार असून, त्यांच्या मेहनतीला आणि संघर्षाला सलाम करण्याचा हा प्रयत्न असेल. अनेक खेळाडू प्रतिकूल परिस्थितीतून पुढे येत यश संपादन करतात; त्यांच्या जिद्दीचा गौरव जिल्ह्यासाठी प्रेरणादायी ठरणार आहे.
स्पर्धा आयोजनासाठी विशेष समिती
जिल्ह्यातील विविध क्रीडा स्पर्धांचे नियोजन अधिक सक्षम आणि शिस्तबद्ध व्हावे, यासाठी पाच सदस्यीय विशेष निवड समिती स्थापन करण्यात आली. ही समिती स्पर्धांचे स्वरूप, नियमावली आणि वेळापत्रक निश्चित करून खेळाडूंना अधिक चांगले व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे.
पंचांनाही मिळणार न्यायासाठी आवाज
खेळाचा आत्मा जपणाऱ्या पंचांना अत्यल्प मानधन मिळत असल्याची खंत सभेत व्यक्त करण्यात आली. सध्या केवळ ३०० रुपये मानधन मिळणाऱ्या पंचांना छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या धर्तीवर १००० रुपये मानधन मिळावे, अशी ठाम मागणी करण्यात आली. खेळाडू इतकेच पंचांचे योगदान महत्त्वाचे असल्याची भावना व्यक्त झाली.
-------------
स्वतंत्र कार्यालयासाठी प्रयत्न
असोसिएशनचे कामकाज अधिक प्रभावी चालावे आणि जिल्ह्याच्या क्रीडा चळवळीला सक्षम केंद्र मिळावे, यासाठी स्वतंत्र कार्यालयाची गरज अधोरेखित करण्यात आली. यासाठी जिल्हाधिकारी आणि जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांकडे अधिकृत पाठपुरावा करण्याचा निर्णय घेण्यात आला.
क्रीडा संघटनांमध्ये आर्थिक शिस्तीवर भर
असोसिएशनच्या कामकाजात पारदर्शकता आणि आर्थिक शिस्त राखण्यासाठी संलग्न सर्व जिल्हा क्रीडा संघटनांनी चालू वर्षाचे संलग्नता शुल्क वेळेत जमा करणे बंधनकारक करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.