

PNE26W18614
अहिल्यानगर ः स्थानिक गुन्हे शाखेने मुद्देमालासह पकडलेले आरोपी.
सराईत चोरटे जेरबंद; दहा गुन्हे उघड
११ लाखांचा मुद्देमाल जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
अहिल्यानगर, ता. १२ ः शेतात काम करणाऱ्या महिलांचे दागिने चोरणारे सराईत गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहेत. त्यांच्याकडून ११ लाख १९ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. नगर तालुक्यातील वाकोडी गावच्या शिवारात जुना जकात नाका येथे ही कारवाई करण्यात आली. आरोपींनी दहा गुन्ह्यांची कबुली दिली आहे.
फिर्यादी ताराबाई मुरलीधर कोकाटे या शेतामध्ये काम करत असताना आरोपींनी त्यांच्या गळ्यातील ७८ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने बळजबरीने चोरून नेले होते. हा प्रकार २१ एप्रिल रोजी घडला होता. याप्रकरणी नगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता. गुन्हा उघडकीस आणण्याच्या दृष्टीने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळाची पाहणी केली. गुन्ह्यातील आरोपींची माहिती काढत असताना व्यावसायिक कौशल्याच्या आधारे हा गुन्हा रेकॉर्डवरील आरोपी गणेश दिवाणजी काळे (रा. वाकोडी, ता. जि. अहिल्यानगर) याने त्याच्या साथीदारासह केला असल्याचे निष्पन्न झाले. तो त्याच्या साथीदारासह अहिल्यानगर-सोलापूर रोडवरील वाकोडी गावच्या शिवारात जुना जकात नाका येथे येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा लावला असता आरोपी पळून जाऊ लागले. पथकाने पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले. गणेश दिवाणजी काळे (वय २८, रा. वाकोडी, ता. जि. अहिल्यानगर), विनय ऊर्फ टकल्या योगेश काळे (वय १९, रा. वाळुंज, ता. जि. अहिल्यानगर) व रोहित लल्या भोसले (वय २३, रा. सराटी वडगाव, ता. आष्टी, जि. बीड) असे ताब्यातील आरोपींची नावे आहेत. आणखी दोन साथीदारांसह हा गुन्हा केल्याची कबुलीही त्यांनी दिली. स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली सहायक निरीक्षक हरीश भोये, महादेव गुट्टे, पोलिस अंमलदार गणेश लोंढे, फुरकान शेख, श्यामसुंदर जाधव, बाळासाहेब खेडकर, भाऊसाहेब काळे आदींनी ही कारवाई केली.
----
राहत्या घरातून मुद्देमाल जप्त
आरोपीच्या राहत्या घरातून नऊ लाख चार हजार ८०० रुपये किमतीचे १०२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, ४५ हजार रुपये किमतीचे तीन मोबाईल, एक लाख ७० हजार रुपये किमतीच्या दोन दुचाकी असा एकूण ११ लाख १९ हजार ८०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपींनी श्रीगोंदे, नगर तालुका, सुपे, बेलवंडी, तोफखाना, भिंगार कॅम्प, पाथर्डी आदी पोलिस ठाण्यांच्या हद्दीत केलेल्या दहा गुन्ह्यांंची कबुली दिली आहे.
---
आरोपी सराईत गुन्हेगार
आरोपी गणेश दिवाणजी काळे हा रेकॉर्डवरील आरोपी आहे. त्याच्याविरुद्ध यापूर्वी अहिल्यानगर व बीड जिल्ह्यामध्ये गंभीर गुन्हे दाखल आहेत, तसेच आरोपी रोहित लल्या भोसले हा देखील रेकॉर्डवरील आरोपी आहे. त्याच्याविरुद्ध पाथर्डी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. आरोपींना नगर तालुका पोलिस ठाण्यात हजर करून अटक करण्यात आली आहे. पुढील तपास नगर तालुका पोलिस करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.