

अहिल्यानगर जिल्ह्यातील
बहुतांश भागात पाऊस
खरिपातील काही पिकांना दिलासा; जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम
ॲग्रोवन वृत्तसेवा
अहिल्यानगर : अहिल्यानगर जिल्ह्यात तब्बल ४० दिवसांच्या खंडानंतर रविवारी (ता. २०) रात्री बहुतांश भागात पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे अल्प पाण्यावर तरलेली बाजरी, कापूस, चारापिकांसारख्या पिकांना दिलासा मिळाला आहे. मात्र, पुरेशा व जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यात यंदा सुरुवातीपासूनच पुरेसा पाऊस नाही. आधीच खरिपाच्या पेरणीला एक महिना उशीर झाला होता. त्यात अल्प पावसावर पेरण्या केल्या. मात्र, त्यानंतर सातत्याने पावसाचा खंड पडत गेला आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पावसाची मोठी तूट झाली असून तब्बल ४० दिवस पावसाचा सलग खंड पडला आहे. त्याचा मोठा फटका खरिपातील पिकांना बसला असून बहुतांश पिके वाया गेली आहेत.
चाळीस दिवसांच्या खंडानंतर सोमवारी (ता. २०) अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा, अहिल्यानगर, श्रीगोंदा, कर्जत, राहुरी भागात पावसाने हजेरी लावली. अल्प पाण्यात तरलेली बाजरी, कापूस, चारापिके, कांदा व अन्य पिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. पावसाचा फारसा जोर नसला तरी जमिनीत ओलावा झाल्याने नुकसानीपासून काही प्रमाणात पिके वाचतील. मात्र, सर्वच भागात पाणी उपलब्ध करणाऱ्या जोरदार पावसाची प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहे.
घाटमाथ्यावरील पावसाने मुळा, भंडारदरा, निळवंडे व अहिल्यानगर जिल्ह्याला लाभ देणारी पुणे जिल्ह्यातील धरणे भरली असली तरी पाथर्डी, कर्जत, जामखेड, पारनेरसह ज्या भागात कसलाच पाऊस नाही, तेथील मध्यम व लघु प्रकल्प, गावतलाव, पाझर तलाव, नद्या कोरड्याठाक आहेत. या भागाला आता परतीच्या जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे.
मंडळनिहाय नोंदवलेला पाऊस (मिमी)
नालेगाव ः २२, सावेडी ः २८, कापुरवडी ः २३, नागापूर ः ३३, जेऊर ः ४९, वाळकी ः २८, सुपा ः ३७, वाडेगव्हाण ः ३३, पळसी ः २७, श्रीगोंदा ः ३४, काष्टी ः २९, मांडवगण ः २०, पेंडगाव ः २१, देवदैठण ः २२, लोणी व्यंकनाथ ः २१, आढळगाव ः ३१, चांदा ः २२, घोडेगाव ः २८, सोनई ः २०, वडाळा ः ४३, ब्राह्मणी ः २०, घारगाव ः २५, वाकी ः ३१.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.