मनोज जरांगे प्रेस

मनोज  जरांगे प्रेस
Published on: 

ऑडिओ क्लिप प्रकरणात एआयचा
आडोसा घेता येणार नाही : मनोज जरांगे

जालना : ‘‘ऑडिओ क्लिप प्रकरणात एआयला पुढे करून भाजपला पळवाट शोधता येणार नाही. या माध्यमातून एकनाथ शिंदे यांची राजकीय कारकीर्द उद्ध्वस्त करण्याचा डाव होता का, अशी शंका येत आहे. हे सगळे करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अंधारात ठेवण्यात आले होते का, याचाही शोध घेतला पाहिजे,’’ असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले. ते सोमवारी (ता. २६) जालना येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

जरांगे पाटील म्हणाले की, ऑडिओ क्लिपमध्ये बोलणाऱ्या लोकांच्या पाठीशी देशातील कोणी मोठा नेता असला पाहिजे. याचा शोध उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घ्यावा. या प्रकरणात शिंदे यांच्यासाठी जी किंमत मोजण्याची वेळ येईल, ती मोजायला आम्ही तयार आहोत. तसेच, या प्रकरणाच्या मुळाशी जाण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनाही आम्ही मदत करायला तयार आहोत, असेही ते म्हणाले.

या वेळी जरांगे पाटील यांनी ५०० कोटी रुपये आणि ऑडिओ क्लिपविषयी सविस्तर भाष्य केले. ते म्हणाले, ‘‘या प्रकरणानंतर आता एकनाथ शिंदे गप्प बसणार नाहीत. हा त्यांच्यावर वैयक्तिक घाव आहे. त्यांचे राजकीय करिअर उद्ध्वस्त करण्याचा डाव होता का, हा प्रश्न आहे. फडणवीस साहेबांनी या प्रकरणाच्या खोलात जाऊन तपास केला, तर त्यांच्या आणि एकनाथ शिंदे यांच्या विरोधात हा डाव होता, हे लक्षात येईल. क्लिपमध्ये बोलणारे लोक कोणाचे आहेत, ही कोणाची यंत्रणा आहे आणि यांच्या पाठीशी कोणाचा हात आहे, असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. या बैठकीतून संबंधित लोक नियोजन करतात आणि नरेटिव्ह सेट करतात, हे दिसून येते. यांच्या पाठीशी दिल्लीतील कोणाचा तरी हात असला पाहिजे. भाजपपेक्षाही मोठी संस्था यांच्या पाठीशी असावी. माझ्याविरोधात बोलणाऱ्या सर्वांना नोटा दिल्याचा आरोपही मनोज जरांगे पाटील यांनी केला.’’

Marathi News Esakal
www.esakal.com