

दुष्काळी धाराशिवला
‘एआय’चे वरदान
-----------------------------
दृष्टिक्षेपात...
- पाण्याचा भरमसाठ उपसा टळला; ७७० शेतकऱ्यांच्या प्रयोगाने बदलले चित्र
- ७५ टक्के पाण्याची बचत करीत केवळ २५ टक्के पाण्यात उसाचे चांगले उत्पादन
- आधुनिक तंत्रज्ञानामुळे टंचाईग्रस्त जिल्ह्याला मिळणार मोठा दिलासा
---------------
अविनाश पोफळे ः सकाळ वृत्तसेवा
धाराशिव : धाराशिवसारख्या दुष्काळी जिल्ह्याला वारंवार तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. प्रकल्पांमधील पाणीसाठा वेगाने आटण्यामागे उसासाठी होणारा भरमसाट पाणीउपसा आणि पारंपरिक पाटपद्धत ही प्रमुख कारणे आहेत. या समस्येवर मात करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात ‘एआय’ तंत्रज्ञान उपयुक्त ठरत आहे. जिल्ह्यातील ७७० शेतकऱ्यांनी उसाच्या शेतात हे तंत्रज्ञान कार्यान्वित केले असून, त्यातून कोट्यवधी लिटर पाण्याची बचत होत आहे. त्यामुळे दुष्काळी जिल्ह्याला दिलासा मिळण्यास मदत होत आहे.
एआय तंत्रज्ञान कसे ठरतेय उपयुक्त?
- उसाच्या मुळांपाशी बसविलेल्या सेन्सरद्वारे पिकाच्या गरजेचा अचूक संदेश दररोज मोबाइलवर मिळतो.
- या तंत्रज्ञानामुळे पाणी, खते आणि कीटकनाशकांचे अचूक नियोजन करणे शक्य होते.
- उसाला किती पाणी द्यावे आणि ठिबक किती वेळ सुरू ठेवावे, याची अचूक माहिती मिळते. त्यामुळे अनावश्यक पाणीउपसा टळतो.
- या तंत्रज्ञानामुळे हवामानाचा अंदाज, रोगराईची पूर्वकल्पना देण्याबरोबर एकरी ६५ ते ७० टनांपर्यंत उसाचे उत्पादन शक्य.
- ७५ टक्के पाण्याची बचत होते आणि अवघ्या २५ टक्के पाण्यात उसाचे जादा उत्पादन निघते.
-----------------
७७० शेतकऱ्यांचा सहभाग
बारामती कृषी विज्ञान केंद्र, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणे आणि स्थानिक साखर कारखान्यांच्या वतीने अनुदानावर हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येत आहे. यामध्ये कळंब तालुक्यातील रांजणी येथील ‘नॅचरल शुगर’ने ५२०, तर धाराशिव तालुक्यातील केशेगाव येथील ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर साखर कारखान्या’ने २५० शेतकऱ्यांच्या शेतात हे एआय तंत्रज्ञान कार्यान्वित केले आहे.
कमी पाण्यात अधिक उत्पादन
शिराढोण (ता. कळंब) येथील शेतकरी हनुमंत सोमासे यांच्या शेतात सध्या ऊस तोड सुरू असून, त्यांना कमी पाण्यात एकरी ७० टन उत्पादन मिळाले आहे. एआय तंत्रज्ञानामुळे विहीर, कूपनलिका आणि प्रकल्पांमधील पाण्याचा अनावश्यक उपसा टळून पाणीसाठा अधिक काळ टिकण्यास मदत होते. त्यामुळे सर्वाधिक पाणी पिणारे पीक ही उसाची ओळख बदलण्यास मदत होत असून, ७७० शेतकऱ्यांचे हे प्रयोग दुष्काळी धाराशिवसाठी आशादायी ठरत आहेत.
कोट
बारामती केव्हीके, व्हीएसआय, पुणे आणि साखर कारखान्याच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. एका यंत्रासाठी २५ हजार रुपये खर्च येतो. मात्र शेतकऱ्यांना हे तंत्रज्ञान केवळ अडीच हजार रुपयांत उपलब्ध करून दिले जात असून, उर्वरित खर्च बारामती केव्हीके, व्हीएसआय आणि कारखान्याच्या वतीने केला जात आहे.
- पांडुरंग आव्हाड, संचालक, नॅचरल शुगर, रांजणी
कोट
कारखाना कार्यक्षेत्रातील २५० शेतकऱ्यांच्या शेतात एआय तंत्रज्ञान बसविले आहे. सेन्सरमुळे पिकाची गरज समजत असल्याने ७५ टक्के पाण्याची बचत होते आणि केवळ २५ टक्के पाण्यात उसाचे जादा उत्पादन मिळते.
- अमर मारवाडकर, व्यवस्थापक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कारखाना, केशेगाव
उसाच्या मुळांपाशी जमिनीत बसविलेले एआय तंत्रज्ञान हवामानाचा अंदाज आणि रोगराईची पूर्वकल्पना देते. उसाला पाणी जास्त किंवा कमी होत असल्याची माहितीही मिळते. या तंत्रज्ञानामुळे एकरी ६५ ते ७० टन उत्पादन मिळत असून, पाणीबचतीसाठी ते दुष्काळी भागात लाभदायी ठरत आहे.
- हनुमंत सोमासे, शिराढोण, ता. कळंब
..........
धाराशिव ः शिराढोण (ता.कळंब) येथील शेतकरी हनुमंत सोमासे यांनी ऊस शेतात बसविलेले एआय तंत्रज्ञान.
फोटो क्रमांक ः2129
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.