‘एसआयआर’ संपले, आता शिक्षकांना ‘एआय’ प्रशिक्षण

‘एसआयआर’ संपले, आता शिक्षकांना ‘एआय’ प्रशिक्षण
Published on: 

‘एसआयआर’ संपले; आता शिक्षकांना ‘एआय’ प्रशिक्षण
राज्य शैक्षणिक संशोधन, प्रशिक्षण परिषदेचे पत्र; ५० तासांचे प्रशिक्षण बंधनकारक

सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. १९ : मतदार पुनरिक्षणाचे (एसआयआर) काम १७ ऑगस्टला संपल्यानंतर त्याच दिवशी इयत्ता पहिली ते बारावीच्या वर्गांवर अध्यापन करणाऱ्या शिक्षकांना ५० तासांचे ‘एआय’ (कृत्रिम बुद्धिमत्ता) प्रशिक्षण पूर्ण करण्याबाबत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना पत्र पाठविले आहे. शिक्षकांना ३० सप्टेंबरपूर्वी प्रशिक्षण पूर्ण करावे लागणार आहे.
‘एआय साथी फॉर एज्युकेटर्स’ हा ऑनलाइन कोर्स सर्व शिक्षकांना करावा लागणार आहे. त्यासाठी ३० ऑगस्टपर्यंत नोंदणीची मुदत देण्यात आली आहे. सोलापूर जिल्ह्यात प्रशिक्षणासाठी अपेक्षित २३ हजार ३६२ शिक्षकांपैकी ११ हजार ४७८ शिक्षकांनी नोंदणी केली आहे. अद्याप ११ हजार ८८४ शिक्षकांनी नोंदणी केलेली नाही.
नोंदणी केलेल्या शिक्षकांपैकी अनेकांनी अद्याप प्रशिक्षण पूर्ण केलेले नाही. त्यामुळे उर्वरित शिक्षकांनी मुदतीत नोंदणी करून ३० सप्टेंबरपूर्वी प्रशिक्षण पूर्ण करावे लागणार आहे. या कोर्ससाठी चार तासांचे ‘सीपीडी’ (सतत व्यावसायिक विकास) प्रशिक्षण श्रेय निश्चित करण्यात आले आहे.
आपापल्या कार्यक्षेत्रातील सर्व शाळांना आवश्यक सूचना देऊन शिक्षकांची नोंदणी करून घ्यावी आणि कोर्स वेळेत पूर्ण करून घ्यावा, अशा सूचना राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या सहसंचालिका डॉ. कमलादेवी आवटे यांनी दिल्या आहेत. हे पत्र सर्व विभागीय उपसंचालक, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे (डाएट) प्राचार्य, महापालिकेचे प्रशासनाधिकारी तसेच प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना पाठविण्यात आले आहे.
----------------------------
३० तास ऑनलाइन; २० तास ऑफलाइन
इयत्ता पहिली ते बारावीच्या वर्गांवर अध्यापन करणाऱ्या शिक्षकांना अध्यापनात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करता यावा, या उद्देशाने प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यासाठी ३० तासांचे ऑनलाइन प्रशिक्षण घ्यावे लागणार आहे. उर्वरित २० तासांचे प्रशिक्षण वर्षभरात ऑफलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहे.
----------------------------
विद्यार्थ्यांना अध्यापन करणाऱ्या सर्व शिक्षकांना ‘एआय’ची प्राथमिक माहिती असावी, यासाठी पहिली ते बारावीच्या वर्गांवरील सर्व शिक्षकांना हा कोर्स करावा लागणार आहे. परिषदेच्या पत्रानुसार शिक्षकांनी मुदतीत नोंदणी करून प्रशिक्षण पूर्ण करणे आवश्यक आहे.
- डॉ. इब्राहिम नदाफ, प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, सोलापूर
-----------------------
सोलापूर जिल्ह्यातील स्थिती
तपशील संख्या
प्रशिक्षणासाठी अपेक्षित शिक्षक २३,३६२
नोंदणी केलेले शिक्षक ११,४७८
नोंदणी न केलेले शिक्षक ११,८८४
नोंदणीची अंतिम मुदत ३० ऑगस्ट २०२६

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com