esakal | मुंबईपेक्षा पुण्याची हवा जास्त खराब; लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर प्रदूषण 
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईपेक्षा पुण्याची हवा जास्त खराब; लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर प्रदूषण 

कोरोनाचा कहर शहरातून पूर्णपणे कमी झाला नसल्याने आता प्रदूषणामुळे आरोग्याची चिंता वाढली आहे. प्रदूषणाचे मुख्य कारण म्हणजेच दिवाळीनिमित्त फटाक्‍यांचा झालेला वापर. लॉकडाउनदरम्यान शहरातील प्रदूषणाच्या पातळीत सुधारणा झाली होती.

मुंबईपेक्षा पुण्याची हवा जास्त खराब; लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर प्रदूषण 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे - लॉकडाउनच्या काळात उत्तम श्रेणीत असलेली पुण्यातील हवेची गुणवत्ता लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर घसरून खराब श्रेणीत पोचली आहे. शनिवारी (ता. 14) मुंबईच्या तुलनेत पुण्याची हवा जास्त खराब झाल्याचे पाहायला मिळाले. भारतीय उष्णकटीबंधीय हवामानशास्त्र संस्थेच्या "सफर'च्या माध्यमातून (आयआयटीएम) हे स्पष्ट झाले आहे. 

वाढलेल्या प्रदूषणामुळे श्‍वसनाचा आजार असलेल्या नागरिकांना आरोग्यासंबंधीचा धोका वाढला आहे. अद्याप कोरोनाचा कहर शहरातून पूर्णपणे कमी झाला नसल्याने आता प्रदूषणामुळे आरोग्याची चिंता वाढली आहे. प्रदूषणाचे मुख्य कारण म्हणजेच दिवाळीनिमित्त फटाक्‍यांचा झालेला वापर. लॉकडाउनदरम्यान शहरातील प्रदूषणाच्या पातळीत सुधारणा झाली होती. रस्त्यांवरील वाहनांचे प्रमाणसुद्धा गेल्या दोन महिन्यांत वाढू लागल्याने हा परिणाम दिसून येत आहे. एकंदरीत वाहनांचे उत्सर्जन, शहरातील व्यवसायांची सुरुवात तसेच दिवाळीतील फटाक्‍यांनी शहरातील प्रदूषणाला चालना दिली आहे, तर मुंबई येथे हवेची गुणवत्ता अद्याप समाधानकारक असल्याचे या अहवालात नोंदवले गेले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


सध्या नोंदवली गेलेली हवेची श्रेणी ही दिवाळीत फटाक्‍यांच्या वापरामुळे आहे. यात शिवाजीनगर, लोहगाव, हडपसरसारख्या काही भागामध्ये पीएम 2.5 चे प्रमाण वाढले असून, येत्या तीन-चार दिवसांत पुन्हा हवेची गुणवत्ता ही समाधानकारकपर्यंत पोचू शकते, असे आयआयटीएमच्या शास्त्रज्ञांमार्फत सांगण्यात आले. 

अतिसूक्ष्म धूलिकणांचे (पीएम 2.5) परिणाम 
- अतिसूक्ष्म धूलिकणाचा आरोग्यावर सर्वाधिक परिणाम होतो 
- हा प्रदूषक लहान मुले व ज्येष्ठांसाठी घातक ठरू शकतो 
- श्‍वसनाच्या मार्गे हे धूलिकण रक्तात व फुप्फुसांप्त खोलवर प्रवेश करतात 
- यामुळे श्‍वास घेण्यास अडचण, खोकला तसेच फुप्फुस व हृदयाच्या कार्यावर परिणाम होतो 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

नागरिकांनी काय घ्यावी काळजी 
- पहाटे व सायंकाळी सूर्यास्तानंतर घराबाहेर पडणे टाळा 
- दम्याच्या रुग्णांनी विशेष काळजी घ्यावी 
- व्यायाम करण्यासाठी जास्त लांब फिरणे टाळा, तसेच सतत जॉगिंग टाळा 
- खोकला, थकवा किंवा श्‍वसनाशी संबंधित त्रास होतील असे कार्य टाळा 

श्‍वसनाच्या आजारांचा धोका वाढला 
शहरात अतिसूक्ष्म धूलिकण (पीएम 2.5), सूक्ष्म धूलिकण (पीएम 10), नायट्रोजन डायऑक्‍साईड (एनओ 2) सारख्या प्रदूषणाच्या घटकांपैकी अतिसूक्ष्म धूलिकणांचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे कोरोनाबरोबर आता नागरिकांना प्रदूषणामुळे होणाऱ्या श्‍वसनाशी संबंधित आजारांचाही सामना करावा लागू शकतो. 

शहरातील रविवारची प्रदूषणाची नोंद 
(प्रमाण मायक्रोग्रॅम प्रतिक्‍युबिक घनमीटर) 
ठिकाण - पीएम 10 - पीएम 2.5 
शिवाजीनगर - 170 - 313 
हडपसर - 244 - 337 
लोहगाव - 197 - 324 
पाषाण - 128 - 173 
निगडी - 168 - 283 
भोसरी - 118 - 169 
आळंदी - 126 - 190