
- सफरद्वारे निरीक्षण केले जाणाऱ्या मुंबई, अहमदाबाद आणि दिल्ली शहरांच्या तुलनेत पुण्यातील अतिसूक्ष्म धूलिकणचे (पीएम 2.5) प्रमाण कमी
पुणेकरांनो, हवेची गुणवत्ता काय हे जाणून घ्यायचंय? मग हे वाचा!
पुणे : देशातील चार प्रमुख महानगरांच्या हवेतील गुणवत्ता काढणाऱ्या 'सफर' या हवामान प्रणालीनुसार पुण्यातील हवेची गुणवत्ता चांगल्या श्रेणीची नोंदली गेली आहे. प्रदूषणातील घटक म्हणून ओळखले जाणारे अतिसूक्ष्म धूलिकणचे (पीएम 2.5) प्रमाण सफरच्या इतर शहरांच्या तुलनेत सलग चार दिवसांपासून कमी असल्याचे दिसून आले.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
सफरच्या माध्यमातून दिल्ली, मुंबई, पुणे आणि अहमदाबाद या चार प्रमुख शहरांच्या हवेची गुणवत्ता नोंदली जाते. दरम्यान, लॉकडाऊनच्या काळात या चारही शहरातील हवेची गुणवत्ता चांगल्या श्रेणीची नोंदली गेली. तसेच या काळात नायट्रोजन ऑक्साईड व सूक्ष्म धूलिकणसारख्या प्रदूषणातील घटकांमध्ये सुद्धा घट झाल्याचे दिसून आले होते. परंतु लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर मात्र हवेची गुणवत्ता ही चांगल्यावरून समाधानकारक श्रेणीवर आली. तर गेल्या चार दिवसांच्या आकडेवारीनुसार शहराच्या हवेची गुणवत्ता सफरच्या इतर तीन शहरांच्या तुलनेत उत्तम असल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, दिल्ली व अहमदाबाद येथील हवेची गुणवत्ता गेल्या दोन दिवसांपासून समाधानकारक दर्शविण्यात येत आहे.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
'सफरद्वारे घेण्यात आलेल्या निरीक्षणातून असे स्पष्ट झाले आहे की पुण्यातील हवेची गुणवत्ता सर्वात चांगली असून, शहरात ढगाळ वातावरण तसेच हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसामुळे अतिसूक्ष्म धुलिकणाचे प्रमाण कमी होत आहे. तसेच सातत्याने पावसाच्या सरी पडत राहिल्या तर हे प्रदूषणातील घटक त्यामुळे वाहून जातात. मात्र, पाऊस पडला नाही तर प्रदूषणातील घटक तसेच हवेत राहतात व त्यामुळे गुणवत्तेत ही परिणाम आढळून येतो."
- डॉ. गुफ्रान बेग, शास्त्रज्ञ - आयआयटीएम
सफरच्या आकडेवारीनुसार विविध शहरातील अतिसूक्ष्म धूळीकण (पीएम 2.5 ची नोंद 25 जुलै रोजी)
- प्रमाण मायक्रोग्राम प्रति क्यूबिक घन मीटर (µg/m3)
शहर : पीएम 2.5
दिल्ली : 30
पुणे : 16
मुंबई : 23
अहमदाबाद : 34