

नफ्याचे आमिष दाखवून
४३ लाखांची फसवणूक
अहिल्यानगर, ता. ६ ः विमानाच्या तिकिटांच्या व्यवसायात मोठा परतावा आणि नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीची तब्बल ४३ लाख ४३ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार अहिल्यानगर शहरासमोर आला आहे. या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात लिओ हॉलिडेजच्या अजयकुमार जगताप याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्यावर यापूर्वीही विविध पोलिस ठाण्यात फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. याबाबत आदेश लुमाजी चेमटे (वय ३४, रा. इंद्रप्रस्थ कॉलनी, नागरदेवळे) यांनी फिर्याद दिली आहे.
फिर्यादी यांना आरोपी अजयकुमार बाळासाहेब जगताप (रा. भिस्तबाग, अहिल्यानगर) याने विश्वासात घेतले. लिओ हॉलिडेज नावाच्या कंपनीद्वारे विमानाची तिकिटे खरेदी करण्याच्या व्यवसायात गुंतवणूक केल्यास खात्रीशीर परतावा आणि मोठा नफा मिळेल, असे आमिष आरोपीने दाखवले. या आमिषाला बळी पडत फिर्यादी आदेश चेमटे यांनी १८ जुलै ते ४ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत बुन्हाणनगर आणि गुलमोहर रोड परिसरात आरोपीला वेळोवेळी रोख स्वरूपात आणि धनादेशाद्वारे एकूण ९८ लाख रुपये दिले. त्यानंतर आरोपी अजयकुमार जगताप याने त्यापैकी ५४ लाख ५७ हजार रुपये परत केले. मात्र, उर्वरित ४३ लाख ४३ हजार रुपये परत न करता फिर्यादीची आर्थिक फसवणूक केली. सतत पाठपुरावा करूनही पैसे परत न मिळाल्याने फिर्यादीने पोलिसांकडे अर्ज दिला होता. अर्जाच्या चौकशीत फसवणुकीचा प्रकार स्पष्ट झाल्यानंतर पाच ऑगस्ट रोजी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात आरोपी अजयकुमार जगताप याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक तेजश्री थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सुहास आव्हाड करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.