विमानतळ पुरंदरमध्येच, पण...

सुनील मेमाणे
मंगळवार, 29 ऑक्टोबर 2019

पारगाव मेमाणे (पुणे) : प्रस्तावित छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळ पुरंदरमध्येच होणार. मात्र, जागेत बदल व पुनर्सर्वेक्षण होणार. संभाव्य बाधित सात गावांमध्ये विमानतळ होणार नाही. येथील शेतकऱ्यांनी निर्धास्त राहावे, अशी ग्वाही पुरंदर-हवेलीचे नवनिर्वाचित आमदार संजय जगताप यांनी पारगाव मेमाणे (ता. पुरंदर) येथे दिले.

 

पारगाव मेमाणे (पुणे) : प्रस्तावित छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळ पुरंदरमध्येच होणार. मात्र, जागेत बदल व पुनर्सर्वेक्षण होणार. संभाव्य बाधित सात गावांमध्ये विमानतळ होणार नाही. येथील शेतकऱ्यांनी निर्धास्त राहावे, अशी ग्वाही पुरंदर-हवेलीचे नवनिर्वाचित आमदार संजय जगताप यांनी पारगाव मेमाणे (ता. पुरंदर) येथे दिले.

आमदारपदी निवडून आल्यानंतर विमानतळ बाधित पारगाव, खानवडी, एखतपूर, मुंजवडी, कुंभारवळण, उदाचीवाडी, वनपुरी या सात गावांतील ग्रामस्थांनी जगताप यांचा नागरी सत्कार केला. या वेळी ते बोलत होते. विमानतळाच्या प्रकल्पाला नव्हे, विमानतळाच्या चुकीच्या जागेला विरोध आहे. शेवटपर्यंत शेतकऱ्यांच्या बरोबरच राहणार. तसेच परतीच्या पावसाने झालेल्या पीक नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असे जगताप यांनी सांगितले.

लायकी नसलेला आमदार जनतेने निवडून दिला होता. म्हणून मागील दहा वर्षांत जनतेची केवळ फसवणूक झाली, अशी भावना पुरंदर तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष माणिक झेंडे यांनी व्यक्त केली. सर्वसामान्यांचा विचार करणारा दानशूर, दमदार आमदार संजय जगताप यांच्या रूपाने तालुक्‍याला मिळाला आहे. विमानतळ बाधितांच्या अवहेलना व वेदना आता थांबवा, अशी विनंती जिल्हा परिषदेचे सदस्य व विमानतळ विरोधी जनसंघर्ष समितीचे अध्यक्ष दत्तात्रेय झुरंगे यांनी केली.

प्रारंभी आमदार संजय जगताप, दत्तात्रेय झुरंगे, सुनीता कोलते यांची ढोल-लेझीम व गुलाल उधळून बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली. सभास्थानी आमदारांच्या हस्ते आनंदाची गुढी उभारून व पेढे भरवून आनंद व्यक्त करण्यात आला. या वेळी पुरंदर पंचायत समिती सदस्य सुनीता कोलते, शिक्षण विस्तार अधिकारी पांडुरंग मेमाणे, सरपंच सर्जेराव मेमाणे, माजी सरपंच जितेंद्र मेमाणे, कुंभारवळणचे सरपंच अमोल कामठे, विमानतळ विरोधी जनसंघर्ष समितीचे कार्याध्यक्ष संतोष हगवणे, खानवडीचे माजी सरपंच रमेश बोरावके, महादेव टिळेकर, चंदन मेमाने, तेजस मेमाणे, वर्षा मेमाणे यांनी मनोगत व्यक्त केले.

लक्ष्मण गायकवाड, विठ्ठल मेमाणे, महादेव मेमाणे, खानवडीचे सरपंच भाऊसाहेब खोमणे, पोलिस पाटील शांताराम सावंत, सचिन होले, मच्छिंद्र कुंभारकर, बी. एम. झुरंगे, कल्पना मेमाणे, पोपट मेमाणे, भारती मेमाणे उपस्थित होते. सरपंच सर्जेराव मेमाणे यांनी प्रास्ताविक केले. पांडुरंग मेमाणे व जितेंद्र मेमाणे यांनी सूत्रसंचालन केले. माजी सरपंच लक्ष्मण गायकवाड यांनी आभार मानले.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Airport In Purandar & Politics