Vidhan Sabha 2019 : पुण्यात आज राज ठाकरे, अजितदादांसह प्रमुख नेत्यांच्या सभा

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 9 October 2019

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे आज पुणे शहरातील आठही मतदारसंघा संदर्भात मार्केट यार्ड येथील निसर्ग मंगल कार्यालयात दुपारी बारा वाजत शहरातील पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेणार आहेत. यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराची व्यूहरचना निश्चित केली जाईल.

पुणे : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, भाजपचे लडाख चे खासदार जमयांग नामग्याल, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आदींच्या सभा, मेळावे, बैठका यामुळे शहरातील वातावरण आज प्रचाराने ढवळून निघणार आहे.
लोकसभा निवडणुकीत आपले उमेदवार उभे न करणारे  राज ठाकरे आपली पहिली राजकीय सभा पुण्यात घेत आहेत.

आज सायंकाळी सहा वाजता बाजीराव रस्त्यावरील नातूबाग मैदानावर यांची जाहीर सभा होत आहे.  'लाव रे तो व्हिडिओ' म्हणत मोदी-शहा यांच्यावर तुटून पडलेल्या राज यांना लोकसभा निवडणुकीत मतदारांनी फारसा प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे राज ठाकरे विधानसभेसाठी कोणता मुद्दा उपस्थित करणार याकडे आता पुणेकरांचे लक्ष लागले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे आज पुणे शहरातील आठही मतदारसंघा संदर्भात मार्केट यार्ड येथील निसर्ग मंगल कार्यालयात दुपारी बारा वाजत शहरातील पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेणार आहेत. यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराची व्यूहरचना निश्चित केली जाईल.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात हेही आज पुण्यात असून, ते काँग्रेस भवन मध्ये पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची सविस्तर चर्चा करणार आहेत. सायंकाळी सहा वाजता पत्रकार परिषद घेऊन पक्षाची भूमिका स्पष्ट करतील.

राज्यात चर्चेचा विषय बनलेल्या कोथरूड विधानसभा मतदार संघात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या प्रचारार्थ लडाख चे खासदार  नामग्याल मैदानात उतरले आहेत. ते कलम 370 वर चर्चा  करणार आहेत.

याशिवाय शहरात प्रत्येक मतदारसंघात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, आप, एम आय एम, वंचित आघाडी या उमेदवारांच्या प्रचार फेऱ्या होणार आहेत. त्यामुळे आजचा संपूर्ण दिवस शहरात प्रचाराचे वातावरण तापणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ajit Pawar and Raj Thackeray campaigning in Pune for Maharashtra Vidhan Sabha