सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्तावर शिक्कामोर्तब

सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्तावर शिक्कामोर्तब
Published on: 

मिलिंद संगई : सकाळ वृत्तसेवा
बारामती, ता. १२ : अतिआत्मविश्वास अनेकदा अंगाशी येतो, याचा प्रत्यय राजकारणात वारंवार येतो, तरीही समर्थकांच्या पाठिंब्याच्या जोरावर नको ते धाडस मुरब्बी नेते करतात आणि आपली कारकीर्द आपल्या हाताने संपवितात. सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीतही माजी अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनीही नको त्या वेळेस बंडाचा झेंडा उभारला आणि चारी मुंड्या चीत होण्याची वेळ त्यांच्यावर आली. अजूनही बारामती अजितदादांचीच आहे, हेच सोमेश्वर कारखान्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या विजयाने पुन्हा एकदा सिद्ध झाले. पुरुषोत्तम जगताप यांचा या निवडणुकीत दारुण पराभव झाला. तसेच, युगेंद्र पवार यांच्या पॅनेलला देखील मोठे अपयश आले. तसेच, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या निवडणूका जिंकता येतात, हीच बाब या निमित्ताने बारामतीच्या राजकीय वर्तुळात अधोरेखित झाली.
तीन दशकांहून अधिक काळ संचालक व एक तपाहून अधिक काळ अध्यक्षपद भूषविल्यानंतर पुरुषोत्तम जगताप यांनी राष्ट्रवादीची साथ सोडत स्वबळावर निवडणूक लढविण्याचा जुगार खेळण्याचा प्रयत्न केला खरा, मात्र सोमेश्वर कारखान्याच्या सभासदांच्या मनात अजूनही अजितदादांप्रती कमालीचा स्नेह असल्याचे मतपेटीतून दाखवून दिले. सहकारी साखर कारखानदारीतील प्रदीर्घ अनुभव पाठीशी असल्याने सभासद आपल्या पारड्यात वजन टाकतील, ही पुरुषोत्तम जगताप यांची अपेक्षा होती. त्यांनी अगदी शेवटच्या क्षणी स्वतःचे पॅनेल करण्याचा धाडसी निर्णय घेतला आणि मग राष्ट्रवादीनेही संपूर्ण ताकद लावत त्यांना त्यांची जागा दाखवून दिली. पक्षाची ताकद ही व्यक्तीहून अधिक मोठी असते. त्यातही बारामती तालुक्यात राष्ट्रवादीचे संघटन कमालीचे मजबूत असल्याचा अंदाज असूनही जगताप यांनी धाडस केले आणि त्यांची कारकीर्दच संपुष्टात आली.
अजितदादा पवार यांनी त्यांच्या हयातीत जगताप यांच्यावर डोळे झाकून विश्वास टाकत त्यांना सर्वाधिकार देऊ केले होते. दादांच्या निधनानंतर राज्यात उत्तम भाव देणारा कारखाना म्हणून नावलौकीक प्राप्त केलेल्या सोमेश्वर कारखान्याचा सभासद काहीही झाले तरी आपल्याच सोबत उभा राहील, या आत्मविश्वासापोटी थेट उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनाच आव्हान देण्याचे पाऊल त्यांनी उचलले. मात्र, दादांच्या निधनाला अजून वर्षही उलटलेले नसताना त्यांनी जे पाऊल उचलले ते सभासदांना रुचलेले नाही. दादांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे असताना त्यांनी बंडाचा झेंडा उभारला, ही बाब सभासदांनी हाणून पाडली. त्यांना मतपेटीतून जागा दाखवून दिली. सभासदांना कोणीही गृहीत धरायचेच नाही, हाच संदेश सोमेश्वरच्या सभासदांनी या निमित्ताने देऊ केल्याची चर्चा कार्यक्षेत्रात आहे.
पुरुषोत्तम जगताप यांच्या कारखान्यातील योगदानाबद्दल सभासदांना आदर होता. अजितदादांसमवेत त्यांनी काम केले, त्याबद्दल त्यांची सातत्याने प्रशंसाही झाली. ही निवडणूक एकतर्फी होईल, अशी शक्यता वाटत असतानाच पॅनेलमधील काही नावांना जगताप यांनी आक्षेप घेत वेगळी चूल मांडण्याचा निर्णय घेतला. सभासद आपल्या पाठीशी उभे राहतील, या अपेक्षेने त्यांनी हा धाडसी निर्णय घेतला खरा, पण राष्ट्रवादीने सुनेत्रा पवार, पार्थ पवार व जय पवार यांच्या नेतृत्वाखाली सर्व शक्ती लावत सभासदांचा विश्वास जिंकत कारखाना खेचून आणला.

खंबीर नेतृत्वाची झलक
सुनेत्रा पवार यांनी सोमेश्वरची निवडणूक लागल्यापासून ज्या पद्धतीने निर्णयप्रक्रिया राबविली, काही धाडसी निर्णय घेतले, सर्वांना सोबत घेऊन जाण्याची जी भूमिका घेतली आणि नंतरच्या काळात पूर्ण वेळ प्रचाराला दिला, ते पाहिल्यानंतर अनेकांना अजितदादांचीच आठवण आली. कोणतीही निवडणूक हलक्यात घ्यायची नाही, हा दादांचा शिरस्ताच होता. सुनेत्रा पवार यांनीही त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत कारखान्याचे कार्यक्षेत्र पिंजून काढले, जय व पार्थ पवार यांनीही व्यूहरचना आखत, पदाधिकारी व कार्यकर्त्यांना विश्वासात घेत ही निवडणूक एकहाती जिंकली. प्रसिद्धीपासून अलिप्त राहत, कोणतेही अनावश्यक विधान न करता सुनेत्रा पवार यांनी सभासदांशी व्यक्तिगत संवाद साधत, त्यांना विश्वास देत खंबीरपणाने प्रत्येक सभातून भूमिका मांडली. ‘दादांप्रमाणेच मीही पूर्ण वेळ तुमच्यासाठीच काम करत राहीन’ हा शब्द दिला आणि सभासदांनीही त्यांचा तो शब्द प्रमाण मानून त्यांच्या पारड्यात भरभरून मते टाकली.

युगेंद्र पवार यांच्याकडून बांधणी
सोमेश्वर कारखान्याच्या माध्यमातून बारामती तालुक्यातील कार्यक्षेत्रातील गावातून सभा घेत संपर्क प्रस्थापित करण्याचा प्रयत्न युगेंद्र पवार यांनी या निमित्ताने केला. कारखान्यात त्यांच्या पॅनेलला फारसे यश मिळणार नाही, याची कल्पना सर्वांनाच होती, पण या निमित्ताने गावोगावी जाऊन आपले नेटवर्क मजबूत करण्याचे काम युगेंद्र पवार यांनी केले. त्यांचे पॅनेल अपेक्षेनुसार फारसा प्रभाव दाखवू शकले नाही. त्यांच्या पॅनेलमुळे मतविभागणी होईल, असा सुरवातीला अंदाज होता, प्रत्यक्षात तसे काही घडले नाही. सभासदांनी सुनेत्रा पवार यांच्या समवेत जाण्याचाच निर्णय घेतल्याचे मतदानातून स्पष्ट झाले.

व्यक्तीपेक्षा पक्षावरच अधिक विश्वास
सोमेश्वरच्या निवडणुकीत गेल्या तेरा वर्षात केलेले काम सभासद विचारात घेतील व काहीही झाले तरी आपल्या सोबतच उभे असतील, असा ठाम विश्वास पुरुषोत्तम जगताप व त्यांच्या सहकाऱ्यांना होता. प्रत्यक्षात निवडणुकीचे वातावरणच वेगळे असते. येथे व्यक्तीपेक्षा सभासद सर्वांगिण विचार करतात, हेच सोमेश्वरच्या निकालानंतर समोर आले. केवळ सोमेश्वर कारखान्यापुरता नाही तर व्यक्तिगत प्रपंचासह सर्वांगिण विकासाशी निगडीत प्रश्न कोण सोडवू शकेल, कोण विकासाची गंगा पुढे नेऊ शकेल, याचा सारासार विचार करून सभासदांनी सुनेत्रा पवार यांच्या पारड्यात आपले मत टाकल्याचे निकालानंतर समोर आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com