अजित पवार म्हणतात, 'मला अॅक्‍शन' घ्यायला भाग पाडू नका'

ज्ञानेश सावंत 
Friday, 11 September 2020

त्यावरच न थांबता अजित पवार म्हणाले, 'मला मोठी ऍक्‍शन घ्यायला भाग पाडू नका,' म्हणजे, कोरोना आटोक्‍यात न आल्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांची गय नसेल, हेच पवार यांनी अधोरेखित केले. 

पुणे : पुणेकरांना हादरवून टाकण्याइतपत कोरोना वाढतोय; हे का आणि कसे घडतेय? एवढे करूनही "रिझल्ट' कुठेच कसा दिसत नाही? मग, तुम्ही सगळीजणं काय करताय? अशा प्रश्‍नांचा मारा करीत, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर शुक्रवारी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

त्यावरच न थांबता "मला मोठी ऍक्‍शन घ्यायला भाग पाडू नका,' असा दमही पवार यांनी भरला. म्हणजे, कोरोना आटोक्‍यात न आल्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांची गय नसेल, हेच पवार यांनी अधोरेखित केले. 

दुसरीकडे, कोरोनाला रोखण्याचे नेमके उपाय आणि त्याचा "रिझल्ट' दाखविण्याऐवजी अधिकारी; मात्र नेहमीप्रमाणे आकड्यांचा समावेश असलेले सादरीकरण करीत राहिले. त्यावरूनही नाराजी व्यक्त करीत पवारांनी थेट कामाचा हिशेब मागितल्याने काही वेळ अधिकाऱ्यांचे तोंडावर बोट दिसले. 

पुण्यातील कोरोनाची साथ झपाट्याने पसरत असल्याचे आकडे पुढे येऊ लागले आहेत. सध्याच्या रोजच्या तपासणीतून 30 टक्‍क्‍यांहून अधिक लोकांना कोरोनाची बाधा होत असल्याने महापालिका प्रशासन हदरले आहे. तर परिस्थितीत सुधारणा न झाल्यास पुणेकरांपुढे मोठे संकट उभे राहण्याची भीतीही महापालिकेला आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या साऱ्या स्थितीवर अजित पवार यांनी शुक्रवारी सकाळी साडेसात वाजतल्यापासून बैठकांचा सपाटा सुरू केला. पहिल्या बैठकीत पुण्यातील स्थिती जाणून घेत, त्यावर चर्चा केली. अपेक्षेप्रमाणे कोरोनाचा टक्का घसरण्याऐवजी तो वाढल्याने बैठकीच्या सुरवातीला अजित पवार यांनी चिंता मांडली.

गेल्या पाच-सहा महिन्यांतील परिस्थितीचा उलगडा करीत, पवार यांनी अधिकाऱ्यांपुढे काही प्रश्‍न मांडले. त्यावर अपेक्षित उत्तरे न मिळाल्याने मात्र ते चिडले आणि म्हणाले, "कामात सुधारणा झाली नाही तर, मला मोठी मोठी ऍक्‍शन घ्यावी लागेल.' पवार यांच्या पवित्र्यावर बैठकीच्या सभागृहात काही मिनिटे पूर्णपणे शांतता पसरली आणि सादरीकरणही बाजुला केले गेले. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

मुंबईतील कोरोनाची साथ ओसरली असली; तरी पुण्यात मात्र काही केल्या कोरोना रुग्ण कमी होईनासे झाले आहेत. या परिस्थितीला पुण्याचे पालकमंत्री या नात्याने अजित पवार यांना जबाबदार धरले जात असल्याचा सूर आहे. त्यावरून राजकीय विरोधकही पवारांच्या दिशेने निशाणा साधत आहेत. परिणामी, स्थानिक प्रशासकीय यंत्रणेतील अधिकाऱ्यांना अंग मोडून काम कामे करावे लागेल, अन्यथा अजित पवारांच्या रोषाला सामोरे जावे लगेल.

(संपादन : सागर दिलीपराव शेलार) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ajit Pawar called a meeting of the administration to stop Corona