राज्यकर्त्यांचा मनूला श्रेष्ठत्व देण्याचा प्रयत्न पुरोगामी महाराष्ट्राला हानिकारक : अजित पवार

politicians
politicians

जुन्नर : ''सध्याचे राज्यकर्ते मनुस्मृतीचे गुणगान गातात ही काळजी करण्याची बाब आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर व तुकाराम महाराजांपेक्षा मनु श्रेष्ठ नव्हता मात्र त्याला श्रेष्ठत्व देऊन सर्वसामान्यांची दिशाभूल करण्याचा राज्यकर्त्यांचा प्रयन्त पुरोगामी महाराष्ट्राला हानिकारक आहे'', असे प्रतिपादन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे व्यक्त केले. येथील शिवनेर शिक्षण प्रसारक मंडळाच्या सहकार महर्षी शिवाजीराव महादेवराव तथा दादासाहेब काळे प्रशासकीय इमारतीतील डीएनए व रसायनशास्र प्रयोगशाळेच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात होते.

आमदार दत्तात्रय भरणे, शरद सोनवणे, माजी आमदार दिलीप ढमढेरे, बाळासाहेब दांगट, पोपटराव गावडे, अतुल बेनके विघ्नहरचे अध्यक्ष सत्यशील शेरकर ,सुरेश घुले,विशाल तांबे, सभापती ललिता चव्हाण, धनराज खोत, सुभाष कवडे तसेच जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, संस्थेचे विश्वस्त, प्राध्यापक, सभासद, आजी- माजी विद्यार्थी व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. 

पवार म्हणाले, ''शिक्षण हा राज्याचा पाया मानून शिक्षणासाठी आघाडी सरकारने जास्तीत जास्त निधी दिला. विविध शिक्षण संस्थांना परवानग्या दिल्या. आता मात्र तसे होत नाही. शिक्षण हे मुठभरासाठी नव्हे तर सर्वांसाठी आहे याचा विसर राज्यकर्त्यांना पडला आहे. अनुदानित शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. गेली चार वर्षे सरकार मात्र समाजयोजनाचे कारण पुढे करत आहे. यामुळे शैक्षणिक संस्था व पात्रताधारक शिक्षक अडचणीत आले आहेत. शैक्षणिक संस्थानी भौतिक सुविधा देताना विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण करण्याचा प्रयत्न व्हावा. नव्याने बांधण्यात येणाऱ्या इमारती शंभर वर्षे टिकतील अशा असाव्यात ''असेही त्यांनी सांगितले.  

'पाणी हा राजकारणाचा विषय नसून तो सर्व सामान्यांच्या जिव्हाळ्याचा व सामाजिक व्यवस्थेचा विषय आहे' असल्याचे स्पष्ट करत आमदार शरद सोनवणे यांनी आगामी निवडणुकीच्या महाआघाडीत मला झुकत माप मिळावे, मी दादांच्या जवळ आहे, मला खाली घेऊ नका, दादा उभ्या महाराष्ट्राचे आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली आयुष्यभर काम करेल अशी जाहीर वाच्यता करत त्यांनी तालुक्यात सुरू असलेल्या विकास कामांच्या श्रेयवादाचा समाचारही घेतला. यावेळी के.एस.डुंबरे,प्राचार्य डॉ.चंद्रकांत मंडलिक तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या माजी विद्यार्थ्यांचा पवार यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. 

संस्थेचे अध्यक्ष अॅड संजय काळे म्हणाले, ''तालुक्यातील पहिल्या महाविद्यालयाचे आज वटवृक्षात रूपांतर झाले आहे. शैक्षणिक दर्जा टिकविणे व गुणवत्तावाढ  यासाठी संस्था नेहमीच प्रयत्नशील राहिली आहे. विनाअनुदानित तत्त्वावरील खर्च वाढला आहे. प्राध्यापकांच्या व संस्थांच्या प्रश्नांची दखल सरकारने घ्यावी. महाविद्यालयाची जुनी इमारत पाडून नवीन इमारत बांधण्याचा मानस आहे. यासाठी दानशूरांनी पुढे यावे असे आवाहन काळे यांनी केले. त्यास श्री काळे, आमदार सोनवणे, किशोर दांगट यांचेसह अजित पवार यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. सूत्रसंचालन सुहास शेटे व वैशाली सावंत यांनी केले. आभार निवृत्ती काळे यांनी मानले.

दादासाहेब काळे यांचे योगदान
जुन्नर तालुक्यातील माजी आमदार स्व. शिवाजीराव काळे, वल्लभ बेनके, माजी खासदार स्व.निवृत्तीशेठ शेरकर यांचे शैक्षणिक क्षेत्रातील योगदान मोठे आहे. त्यांच्या दुरदृष्टीमुळे आज शैक्षणिक संस्थांचे जाळे तालुक्यात उभे आहे. या संस्थांतून चारित्र्य संपन्न गुणवंत विद्यार्थी घडावेत यासाठी प्रयत्न करावेत. या वास्तूला दादासाहेब काळे नाव देऊन गेल्या पन्नास वर्षाचा इतिहास जोडण्याचे काम केले आहे. शिव छत्रपतीचे नाव असणाऱ्या या महाविद्यालयाचा नावलौकिक तसाच वाढवा यासाठी संस्था चालक व प्राध्यापक यांनी प्रयत्न करावा.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com