निवडणुकीचा प्रचार साध्या पद्धतीने करा
निवडणुकीचा प्रचार साध्या पद्धतीने करा
अजितदादांच्या निधनानंतर दुःखाच्या सावटामुळे बार्शीतील नेत्यांचे आवाहन
सकाळ वृत्तसेवा
बार्शी शहर, ता. २९ : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अपघाती निधन झाल्यामुळे संपूर्ण राज्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सध्या तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होत आहेत. प्रचाराच्या दुसऱ्याच दिवशी गुरुवारी ही घटना घडल्याने मागील दोन दिवस दोन्हीही गटांनी आपले नियोजित कार्यक्रम रद्द करून अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. यापुढचे सर्व निवडणुकीचे सर्व कार्यक्रम साध्याच पद्धतीने करण्याचे आवाहन आमदार दिलीप सोपल आणि माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी समाज माध्यमातून केले आहे.
तालुक्यातील निवडणुका असल्याने ग्रामीण भागातील नेत्यांनी, उमेदवारांनी, कार्यकर्त्यांनी कोणत्याही प्रकारे हलगी, ढोल, ताशा, स्पीकर किंवा इतर वाद्य न वाजवता, फटाके न वाजवता मतदारांच्या घरोघरी जाऊन थेट प्रचार करावा. मतदारांना स्थानिक पातळीवरच्या भेटीवरच लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन आमदार सोपल आणि माजी आमदार राऊत यांनी आपापल्या समाजमाध्यमातून कार्यकर्त्यांना केले आहे.
अजितदादांच्या अपघाती निधनाने आपल्या तालुक्याला दुःख झाले असून गट व गणाच्या प्रचार यंत्रणेत फटाक्यांची आतषबाजी, वाद्यवादन करू नये, असे नमूद करत पदयात्रा आणि मतदारांच्या गाठीभेटीवर लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन राजेंद्र राऊत यांनी भाजपच्या सर्व उमेदवार व कार्यकर्त्यांना केले आहे.
आपल्या बार्शी तालुक्याचे पालक, तालुक्यावर लक्ष असलेले आणि बार्शीच्या विकासासाठी नेहमीच प्रयत्नशील असलेल्या अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे आपल्यासह राज्याला धक्का बसला आहे. निवडणूक पुढे जाईल न जाईल काहीच माहीत नाही. त्यामुळे आता सुरू असलेल्या जि. प. व पं. स.च्या निवडणूक प्रचारात आपल्या महाआघाडीच्या उमेदवार, कार्यकर्ते, नेते यांनी हलगी वादन, फटाके याचे प्रदर्शन करू नये. मतदारांच्या वैयक्तिक गाठीभेटीवरच प्रचार करावा, असे आवाहन आमदार सोपल यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

