

Ajit Pawar funeral emotional scenes Baramati
sakal
बारामती : मैदानातील धुळीचे लोट अंगावर झेलत "दादांना शेवटचे भेटू" असे सांगणाऱ्या माय - माऊली हुंदके देत तिरंगी ध्वजात लपेटलेले दादांचा देह आपल्या लेकराला दाखवत राहिली, लाखांच्या गर्दीत घशाला कोरड पडलेली असूनही "एकच वादा अजित दादा" अशी घोषणा देणारा अवघ्या तिशीतला तरूण धाय मोकलून रडत होता...तर, मैदानाच्या कोपऱ्यात ८६ वर्षांच्या आजोबांची "दादा तुम्ही परत या" ही आर्त साद काळजाचा ठाव घेत राहिली.दादांच्या जाण्यामुळे झालेल्या दुःखाने इथला प्रत्येकजण आतून तुटला होता, त्यातच "शांत व्हा, आता आपण दादांना शेवटचा निरोप देऊ" हे धीरगंभीर शब्द मैदानात घुमले अन् उपस्थित शेकडो कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला. आत्तापर्यंत भावनांना घातलेली आवर सैल करत, देहभान विसरून शेकडो कार्यकर्ते, पदाधिकारी व बारामतीकारांनी आपल्या लाडक्या दादांच्या नावाने टाहो फोडला ! आसमंतात झेपावणाऱ्या ज्वाळांना हात जोडत दादांना लाखो कार्यकर्त्यांनी अखेरचा निरोप दिला !