अजित पवार यांच्या कार्यकाळातच बीआरटीला मूठमाती?

मंगेश कोळपकर
Tuesday, 28 January 2020

पुण्याच्या महापालिकेत आयुक्तपदाची सूत्रे नुकतीच स्वीकारलेल्या शेखर गायकवाड यांनी बीआरटी प्रकल्पाचा आढावा घेऊन बंद करण्याचे सूतोवाच केले आहे. बीआरटी आंधळेपणाने पुण्यात राबविली आहे, असेही त्यांनी महापालिकेच्या सभागृहात अर्थसंकल्पाचे सादरीकरण करताना म्हटले होते.

पुणे : पालकमंत्री असताना ज्या अजित पवार यांनी पुण्यातील बीआरटी प्रकल्पातील विविध मार्गांचे अवघ्या चार-पाच वर्षांपूर्वी धडाकेबाज पद्धतीने उद्‌घाटन केले, त्याच प्रकल्पाला आता मूठमाती मिळण्याची चिन्हे आहेत. अन्‌ योगायोगाने पालकमंत्रीपदावर पुन्हा अजित पवारच आहेत. त्यामुळे ज्यांनी प्रकल्पाचे उद्‌घाटन केले त्यांच्या उपस्थितीत प्रकल्प बारगळणार, असा विचित्र योगायोग या निमित्ताने जुळून आला आहे. त्यामुळे पुण्यात आता घड्याळाचे काटे उलटे फिरतील, अशी शक्‍यता निर्माण झाली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुण्याच्या महापालिकेत आयुक्तपदाची सूत्रे नुकतीच स्वीकारलेल्या शेखर गायकवाड यांनी बीआरटी प्रकल्पाचा आढावा घेऊन बंद करण्याचे सूतोवाच केले आहे. बीआरटी आंधळेपणाने पुण्यात राबविली आहे, असेही त्यांनी महापालिकेच्या सभागृहात अर्थसंकल्पाचे सादरीकरण करताना म्हटले होते. गायकवाड यांच्या या वक्‍तव्याने अधिकाऱ्यांसह नगरसेवकांनाही आश्‍चर्याचा धक्का बसला. पुण्यात कात्रज- स्वारगेट- हडपसर मार्गावर पथदर्शी बीआरटी प्रकल्प राबविण्यात आला. त्याला चांगले यश मिळू लागल्यामुळे पुण्यात 100 किलोमीटरच्या बीआरटी जाळे निर्माण करण्याचा ठराव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने मंजूर केला. त्याची अंमलबजावणीही सुरू झाली. त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने कोट्यावधी रुपयांचा निधीही महापालिकेला दिला.

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री या पदावर असताना अजित पवार यांच्या हस्ते ऑगस्ट 2015 मध्ये विश्रांतवाडी- महापालिका, सप्टेंबर 2015 मध्ये सांगवी- किवळे, एप्रिल 2016 मध्ये नगर रस्ता बीआरटीचे उद्‌घाटन झाले. बीआरटी वेगाने कार्यान्वित व्हावी, यासाठी अजित पवार यांनी स्वतः बारकाईने लक्ष घातले होते. बीआरटीसाठी पुरेशा बस उपलब्ध होतील, याकडेही लक्ष दिले होते. पवार यांच्याच दृष्टिमुुळे पिंपरी चिंचवडमध्ये बीआरटी प्रकल्प अजूनही चांगल्या पद्धतीने सुरू आहे. तसेच हा प्रकल्प पुण्याच्या बीआरटीलाही कनेक्‍ट करण्यात आला आहे. त्यामुळे बीआरटी प्रकल्प पुण्यात सक्षम करण्याची घोषणा आयुक्त शेखर गायकवाड करतील, असे वाटत असतानाच त्यांनी मात्र, "हा प्रकल्प पुण्यात आंधळेपणाने राबविला,' असे मत व्यक्त केले आहे. बीआरटी प्रकल्प राबविण्यापूर्वी महापालिकेने प्रदीर्घ पाहणी केली होती. नगरविकास खात्यातील सचिव आणि तत्कालीन महापालिका आयुक्त डॉ. नितीन करीर यांनीही ही संकल्पना रुजावी म्हणून प्रयत्न केले होते. तर, त्यानंतर कुणाल कुमार यांच्यासह बहुतेक सर्वच आयुक्तांनी बीआरटीला पाठबळ दिले होते. मात्र, आता घड्याळाचे काटे उलटे फिरविण्याच्या गायकवाड यांच्या प्रयत्नाबद्दल कुतूहल निर्माण झाले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ajit Pawar inaugurated BRT project in Pune may be closed