मेट्रो, पुरंदर विमानतळासह रखडलेली विकासकामे मार्गी लावा- अजित पवार

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 22 August 2020

कोरोनाच्या परिस्थितीमुळे जिल्ह्यातील विकासाचे प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत रखडणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. पुरंदर विमानतळाचे काम लवकर सुरु करून गतीने पूर्ण होण्यासाठी प्रयत्न करावेत.

पुणे - "कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी मानाचे गणपती आणि इतर सार्वजनिक गणेश मंडळांच्या दर्शनासाठी कोणालाही परवानगी देता येणार नाही, याची पोलिस विभागाने दक्षता घ्यावी. तसेच, मेट्रो, पुरंदर विमानतळ यासह रखडलेली विकासकामे लवकर मार्गी लावावीत,' अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या. 

विधानभवन सभागृहात शुक्रवारी जिल्ह्यातील 'कोविड व्यवस्थापन आणि नियोजना'बाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. पवार म्हणाले, "पुण्यातील गणेशोत्सव आणि विसर्जन मिरवणुकीला मोठी परंपरा आहे. परंतु यावर्षी कोरोनाची महामारी असल्यामुळे संसर्ग रोखण्यासाठी घरगुती स्वरुपात गणेशोत्सव साजरा करणे आवश्‍यक आहे. नागरिकांनी घरातल्या गणपतींचे घरातच तर, सार्वजनिक मंडळांच्या गणेश मूर्तींचे विसर्जनही साधेपणाने करणे गरजेचे आहे. यासाठी सार्वजनिक विसर्जनाच्या ठिकाणी कोणीही गर्दी करु नये.' 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

कोरोनाच्या परिस्थितीमुळे जिल्ह्यातील विकासाचे प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत रखडणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. पुरंदर विमानतळाचे काम लवकर सुरु करून गतीने पूर्ण होण्यासाठी प्रयत्न करावेत. पुणे-नाशिक रेल्वेमार्गाचे काम मार्गी लागण्यासाठी उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी. पुणे मेट्रोसह जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण प्रकल्पांची कामे वेगाने पूर्ण होण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. 

महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले, गणेश विसर्जनाबाबत सार्वजनिक गणेश मंडळांना विश्वासात घेऊन पोलिस आणि महापालिका प्रशासनाने योग्य ते नियोजन केले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता घरगुती स्वरुपात विसर्जन, फिरत्या विसर्जन हौदाची व्यवस्था आणि गणेशमूर्तीं दान केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. विभागीय आयुक्त सौरभ राव आणि जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी जिल्ह्यातील कोरोना उपाययोजना संदर्भात माहिती दिली.'आयसर'चे अर्नब घोष व डॉ. आरती नगरकर यांनी कोरोनाविषयी सादरीकरण केले. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

रुग्णदर आणि मृत्यूदर नियंत्रणात ठेवा 
पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रासह ग्रामीण भागात कोरोना रुग्णदर आणि मृत्यूदर नियंत्रणात आणण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात. रुग्णांना खाटा अपुऱ्या पडणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोणत्याही परिस्थितीत शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातील कोरोना संसर्गावर नियंत्रण आणणे गरजेचे आहे, यासाठी विशेष लक्ष द्यावे. 

देशभरातील इतर बातम्यांसाठी येथे क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ajit Pawar instructed that development works including Metro,Purandar Airport