चौकशी अहवालानंतरच सत्य समोर येईल

चौकशी अहवालानंतरच सत्य समोर येईल
Published on: 

पुणे, ता. १७ : ‘‘दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत आमदार रोहित पवार यांच्या मनात अस्वस्थता आहे. त्यातूनच ते या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा करून प्रश्न उपस्थित करत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे जाहीर कार्यक्रमात या अपघाताची तातडीने चौकशी करून सत्य समोर आणण्याची मागणी केली आहे. त्यामुळे आता संबंधित चौकशी अहवाल येण्याची आपण वाट पाहिली पाहिजे,’’ असे मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी मंगळवारी व्यक्त केले.
बारामती लोकसभा मतदारसंघातील विविध समस्या आणि विकासकामांचा आढावा घेण्यासाठी सुळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांची भेट घेतली. या वेळी शेतकऱ्यांना पाच हजार रुपयांचे अनुदान, रोजगार हमी योजनेतील अटी, तसेच विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) प्रक्रियेत मतदारांची नावे गहाळ होण्याच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
आमदार रोहित पवार यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री फडणवीस यांचे छायाचित्र दाखवत ‘व्हीएसआर’ विमान कंपनीवर सरकार मेहेरबान आहे का, असा प्रश्न उपस्थित केला होता. याबाबत विचारले असता सुळे म्हणाल्या, ‘‘नागरी विमान वाहतूक हा विषय राज्य सरकारच्या अखत्यारीत नसून केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे. त्यामुळे संबंधित मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाकडे (डीजीसीए) विमान अपघाताच्या चौकशीची जबाबदारी येते. रोहित पवार या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा करत आहेत. त्यांच्याशी याबाबत नक्कीच संवाद साधू; मात्र त्यांच्या भावनाही समजून घेतल्या पाहिजेत. काकांचे नेमके काय झाले, हा प्रश्न त्यांना अस्वस्थ करत आहे.’’
भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी रोहित पवार यांच्याबाबत शरद पवार यांना पत्र लिहिले असल्याबद्दल विचारले असता सुळे म्हणाल्या, ‘‘शरद पवार यांनी त्यांच्या सहा दशकांच्या राजकारणात कधीही कोणावर आरोप-प्रत्यारोप केले नाहीत. मात्र आजचे नवीन पिढीचे राजकारण वेगळे आहे. प्रत्येकाची राजकारणाची वेगळी शैली असते, तशी रोहित यांची आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वतः गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे चौकशीची मागणी केली असेल, तर आपणही अहवालाची वाट पाहिली पाहिजे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.