'मरगळलेल्या राष्ट्रवादीत जान निर्माण करत अजित पवारांनी विजयश्री खेचून आणली'

Ajit Pawar
Ajit Pawar

बारामती/ माऴेगाव : गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील सहकारी साखर कारखानदारीत चर्चेत असलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विजयश्री अक्षरशः खेचून आणली. मरगळलेल्या राष्ट्रवादीत जान निर्माण करत अजित पवार यांनी माळेगाववर पुन्हा वर्चस्व प्रस्थापित केले. माळेगावच्या यशाचे खरे शिल्पकार अजित पवार हेच असल्याची प्रतिक्रीया राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर व गटनेते सचिन सातव यांनी बोलून दाखविली. 

बारामतीच्या राजकीय वर्तुळात माळेगाव सहकारी साखर कारखान्याला विशेष महत्व आहे. चंद्रराव तावरे यांनी पाच वर्षांपूर्वी अजित पवार यांच्या पॅनेलचा पराभव करत सत्ता स्थापन केली. त्या नंतरच्या काळात चंद्रराव तावरे व रंजन तावरे या दोघांनीही भाजपशी हातमिळवणी करत थेट पक्षप्रवेश केला. भाजपचे त्या काळातील वर्चस्व व विधानसभा निवडणूकीतही भाजपच पुन्हा  सत्तेवर येणार हा होरा बांधत चंद्रराव व रंजन तावरे यांनी देवेंद्र फडणवीस व चंद्रकांत पाटील यांच्याशी युती केली. 

सत्तांतरानंतर राज्यात महाविकासआघाडी सत्तेवर आल्यानंतर अजित पवार यांनी अधिक आक्रमकपणे माळेगाव कारखान्याच्या निवडणूकीत प्रचार करत मतदारांच्या मनात विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न केला. अजित पवार यांच्या राजकारणाची पध्दत बारामतीकरांना माहिती असल्याने त्यांनी या निवडणूकीत घेतलेला रस पाहून अनेक मतदारांचे मन बदलले आणि त्यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवारांना पर्यायाने अजित पवार यांना मत देत त्यांच्यावर विश्वास दाखविला आहे. 

माळेगावच्या निवडणूकीत राष्ट्रवादीत एक प्रकारची मरगळ होती, चंद्रराव तावरे व रंजन तावरे यांना पराभूत करणे अवघड असल्याचे राष्ट्रवादीचेच कार्यकर्ते खाजगीत बोलून दाखवित होते, एक तरी कारखाना विरोधात असला पाहिजे अशीही चर्चा सुरु असायची, मात्र अजित पवार यांनी ताकद पणाला लावून सर्व समीकरणे बदलून टाकली. शेवटच्या चार दिवसात अजित पवार यांनी रिंगणात उतरत बाजी पलटवून दाखविली. अजित पवार शब्दाला पक्के आहेत याची जाणीव बारामतीकरांना आहे, चांगला भाव देतो हा शब्द त्यांनी दिल्याने सत्तापरिवर्तन झाले. 

निवडणूक गांभीर्याने घेतल्याने यश....
उपमुख्यमंत्री झाल्यानंतर अजित पवार यांनी एका साखर कारखान्याच्या निवडणूकीत लक्ष घातल्याने विरोधकांनीही त्यांच्यावरी टीकास्त्र सोडले होते, मात्र माळेगावमध्ये दोनदा पराभव झाल्याचे शल्य अजित पवार यांच्या मनात खोलवर होते, अनेकदा जाहिर भाषणातही त्यांनी हे बोलून दाखविले होते. अर्थमंत्रीपदाची जबाबदारी आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी अत्यंत महत्वाचा वेळ देत या कारखान्यातील सभासदांना विश्वास दिला आणि सभासदांनीही अजित पवार यांच्या सोबत उभे राहण्याचा निर्णय घेतला. कोणतीही निवडणूक गांभीर्यानेच लढविण्याचा पवार यांचा स्वभाव असल्याने या निवडणूकीत त्यांना यश आले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com