उपनगरांत सलग दुसऱ्या दिवशी उत्स्फूर्त बंद

उपनगरांत सलग दुसऱ्या दिवशी उत्स्फूर्त बंद

Published on

पिंपरी, ता. २९ ः दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सन्मानार्थ पिंपरी चिंचवडच्या भोसरी, दिघी, आकुर्डी, रावेत, किवळे, मामुर्डी आदी विविध उपनगरांत गुरुवारी (ता.२९) सलग दुसऱ्या दिवशी उत्स्फूर्तपणे बंद पाळला. अत्यावश्यक सेवा वगळता लघुउद्योजक, व्यावसायिक आणि दुकानदारांनी आपले दैनंदिन व्यवहार बंद ठेवले.
राज्य सरकारने अधिकृतपणे तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर केला असून सर्व प्रमुख राजकीय व्यक्ती आणि नेत्यांनी अजित पवार यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले. त्या पार्श्वभूमीवर, उपनगरांतील नागरिकांनी दररोजचे व्यवहार स्वयंस्फूर्तीने बंद ठेवले.

भोसरीत शुकशुकाट
भोसरी ः भोसरी, दिघी, इंद्रायणीनगर परिसरात सलग दुसऱ्या दिवशी दुकाने बंद ठेवून आणि शोकसभेद्वारे अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यामुळे या परिसरातील बाजारपेठेत शुकशुकाट होता. त्याचप्रमाणे रस्त्यावर वर्दळही तुरळक राहिली. भोसरी, दिघी, इंद्रायणीनगर परिसरात होर्डिंग्जद्वारे आणि फ्लेक्स उभारुनही त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
भोसरीतील आळंदी रस्ता, दिघी रस्ता, पुणे-नाशिक महामार्गाचा सेवा रस्ता, पीएमटी चौक, चांदणी चौक ते लांडेवाडी रस्ता, दिघीतील छत्रपती संभाजी महाराज चौक, पुणे-आळंदी पालखी मार्ग, आदर्शनगर इंद्रायणीनगरातील मिनी मार्केट, श्री तिरुपती बालाजी चौक, साई चौक, इंद्रायणी स्वीट आदी परिसरातील दुकानदार आणि व्यावसायिकांनी सलग दुसऱ्या दिवशी दुपारी तीन वाजेपर्यंत दुकाने बंद ठेवून श्रद्धांजली वाहण्यात आली.

इंद्रायणीनगरात श्रद्धांजली
इंद्रायणीनगर-बालाजीनगर प्रभाग क्रमांक आठमध्ये जिल्हा मध्यवर्ती सुविधा केंद्रात शोकसभा घेऊन पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यांच्या जाण्याने राज्याच्या राजकारणात आणि समाजकारणात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली असल्याचे नगरसेवक तुषार सहाणे यांनी सांगितले.
दीपक सोनवणे, योगेश आंबले, गिरीश वाघमारे, बिपीन साळुंखे आदींनीही श्रद्धांजली वाहिली. यावेळी स्वदीप अडसूळ, सचिन काळे, विठ्ठल वाळुंज, ॲड. अतुल कांबळे, भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक श्री राठोड, दादा मातले, प्रकाश सहाणे, विश्वनाथ टेमगिरे, संदीप शिंदे आदींसह कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी ‘अजितदादा अमर रहे’च्या घोषणा देण्यात आल्या.

सार्वजनिक वाहतूक ठप्प
रावेत ः रावेत, किवळे, मामुर्डी, विकासनगर, आकुर्डी भागांत नागरिकांनी कडकडीत बंद पाळला. राजकीय, सामाजिक, विविध संस्था-संघटनांनी आणि नागरिकांनी सकाळपासून बंदला पाठिंबा देत सार्वजनिक वाहतूक आणि बाजारपेठा बंद ठेवल्या.

‘‘आज आम्ही काम बंद ठेवले आहे. अजित पवार यांच्या योगदानाच्या सन्मानार्थ आम्ही हा बंद पाळला.’’
- वर्षा देशमुख, नागरिक

‘‘राज्यातील उत्स्फूर्त बंदला आमचे समर्थन आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त सर्वांसाठी धक्का आहे.’’
- आशुतोष पाटील, नागरिक

लघुउद्योजकांच्या आठवणी
निगडी ः रुपीनगर, त्रिवेणीनगर, गणेशनगर, तळवडे, ज्योतिबानगर भागांत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने व उद्योग गुरुवारी बंद राहिले. या भागातील अनेक लघुउद्योजकांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यामध्ये किंवा विकास करण्यात तसेच अनेकवेळा विविध अडचणी सोडविण्यासाठी अजित पवार यांनी मोलाची मदत केली. समस्या आल्यानंतर प्रत्येकवेळी त्यांनी खूप सहकार्य केल्याच्या भावना अनेकांनी व्यक्त केल्या.

‘म्हाळसाकांत’मध्ये शोकसभा
‘‘अजित पवार यांच्या अपघाती निधनाने शैक्षणिक क्षेत्रात खूप मोठे नुकसान झाले. ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थी यांचा आधार हरवला. पुणे जिल्ह्यातील एक लाख विद्यार्थी शिक्षण मंडळात शिकतात. त्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली’’, असे प्रतिपादन श्री म्हाळसाकांत विद्यालयाचे प्राचार्य भानुदास मालुसरे यांनी केले.
आकुर्डी येथील शाळेत शोकसभा झाली. त्यावेळी ते बोलत होते. शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या वतीने पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी उपप्राचार्य शशिकांत सात्रस, सुरेखा पठारे, दीपा पारवे व इतर उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com