Vidhan Sabha 2019 : बारामतीमध्ये जोरदार शक्तिप्रदर्शन करत अजित पवार यांचा अर्ज दाखल 

मिलिंद संगई
Friday, 4 October 2019

बारामती विधानसभा मतदारसंघात महाआघाडीतर्फे उमेदवार माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

बारामती शहर : बारामती विधानसभा मतदारसंघात महाआघाडीतर्फे उमेदवार माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अजित पवार यांच्या नावाच्या घोषणा दिल्या.

दरम्यान, यापूर्वी कसब्यातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार घालून मिरवणुकीची सुरुवात झाली. तिथून गुणवडी चौक, इंदापूर चौक मार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून बारामती येथील प्रशासकीय भवन येथे त्यांनी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत मुलगा पार्थ आणि जय देखील होते.

दरम्य़ान, बारामतीच्या चौकाचौकात पवार यांचे स्वागत करण्यात येत होते. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर अजित पवार यांनी पत्रकरांशी संवाद साधला.

यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की, मी खडसे यांना भेटलो नाही. आमच्यामध्ये कुठलीही चर्चा झालेली नाही. त्या दिवशी मी मुंबईत होतो, तरी काही वृत्तवाहिन्या मी जळगावात गेलो आणि विमानात बसलो अश्या बातम्या दाखवत होते, मला देखील हे चॅनेलवाल्यांकडूनच कळाले. या अशा बातम्यांमुळे चॅनेलवाल्यांच्या विश्वासार्हतेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण होते.  

ते पुढे म्हणाले, मी बाहेरचा आतला असा काही प्रचार करणार नाही, तर मी बारामतीत केलेल्या विकासकामांचा प्रचार करणार आहे. माझ्या विरोधात अनेकांनी निवडणुका लढविल्या पण येथील नागरिकांनी विकासाला साथ दिली. प्रत्येक निवडणूक ही वेगळी असते. मला महिला व तरूणांचा मोठा प्रतिसाद असल्याचे पवार यांनी सांगितले.  

भाजपच्या 3 मंत्र्यांना तिकीट नाकारले याबद्दल विचारले असता, अजित पवार म्हणाले, यामुळे मी पण बुचकळ्यात पडलो आहे. पण हा त्यांचा पक्षाचा अंतर्गत विषय आहे. पिंपरीतून अण्णा बनसोडे यांना तिकीट दिले असल्याचेही पवार यांनी यावेळी सांगितले. कमीत कमी 1 लाखांचे मताधिक्य मिळणार असल्याचे सुतोवाच त्यांनी केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ajit Pawar's application was filed in Baramati