दादांच्या अकाली जाण्याने खेड तालुक्याचे नुकसान

दादांच्या अकाली जाण्याने खेड तालुक्याचे नुकसान

Published on

कडूस, ता. १ ः ‘‘खेड तालुक्यातील शेवटच्या टोकातील अतिदुर्गम व आदिवासीवस्ती व पाड्यापर्यंत रस्त्यांचे जाळे निर्माण करण्यासाठी अजितदादा यांचे योगदान अनमोल आहे. या दळणवळण सुविधेमुळे तालुक्यात खरी सुबत्ता आली आहे. सुमारे दोनशे कोटी रुपयांच्या निधीतून सुरू असलेल्या कडूस राजगुरुनगर मार्गे शिरदाळे रस्त्याच्या रुंदीकरण व काँक्रीटीकरणाचे काम सुद्धा अजितदादांचीच पुण्याई आहे. त्यांच्या अकाली मृत्यूने खेड तालुक्याचे कधीही न भरून येणारे नुकसान झाले आहे,’’ असे मत राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेश उपाध्यक्षा कांचन ढमाले यांनी कडूस (ता. खेड) येथील सर्वपक्षीय शोकसभेत व्यक्त केले.
कडूस येथील ग्रामपंचायत कार्यालय चौकात ग्रामस्थांनी आयोजित केलेल्या शोकसभेत अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी उपस्थितांकडून अजितदादांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करण्यात आली. या शोकसभेत ढमाले बोलत होत्या. या शोकसभेत उपस्थित मान्यवरांनी अजितदादांबद्दलच्या आठवणींना उजाळा दिला. कडूस व परिसरावर दादांचे विशेष प्रेम होते, असे भैरवनाथ पतसंस्थेचे संस्थापक अभिनाथ शेंडे यांनी स्पष्ट करत कडूस परिसरातील विकास कामांसाठी दादा कधीच निधी कमी पडून देत नव्हते. माजी जिल्हा परिषद सदस्य दिवंगत अशोकभाऊ शेंडे यांना दादांनी विकास कामांसाठी निधी देताना कायम झुकते माप पदरात टाकले. दादांच्या अकाली जाण्याने खेड तालुक्याचे मोठे नुकसान झाले, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. या शोकसभेत अनेकांना अश्रू अनावर झाले होते. ‘‘दादांच्या अकाली जाण्याने तालुक्याच्या विकासाचे स्वप्न अधुरे राहिले आहे, त्यांच्या विचारसरणीने यापुढे तालुक्यातील प्रत्येक राजकीय माणसाने काम करायला हवे, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल,’’ असे कडूस विकास सोसायटीचे अध्यक्ष शंकरराव कावडे म्हणाले. ‘‘सर्वसामान्यांना नजरेसमोर ठेऊन विकास करणारा जनमानसातील आधारवड देवाने पळवला,’’ असे भावनिक उद्‍गार ग्रामपंचायतीचे माजी सदस्य चांगदेव ढमाले यांनी व्यक्त केले. जिल्हा विद्युत नियंत्रण समिती सदस्य रवींद्र गायकवाड म्हणाले, ‘‘जिल्हा विद्युत नियंत्रण समितीच्या वारंवार बैठका व्हायच्या. यात दादांचा प्रत्यक्ष सहवास मिळाला. त्यांच्या कामाचा आवाका आजच्या अनेक नेत्यांचा कुवतीबाहेरचा होता. राज्यासाठी व्हिजन असलेला सर्वसामान्यांचा कैवारी हरपला.’’
यावेळी सरपंच हेमलता खळदकर, जिल्हा विद्युत नियंत्रण समिती सदस्य रवींद्र गायकवाड, संतोष ढमाले, अशोक गारगोटे, निवृत्ती नेहेरे, माजी सभापती किसनराव नेहेरे, अंकुश राक्षे, दामोदर बंदावणे, दिलीप ढमाले, सोसायटीच्या संचालिका भावना शेंडे, पंडित मोढवे, वसुधा राक्षे, प्रियांका देवदरे, अनिकेत धायबर, विजया नाईक, सुधा पानमंद, लता ढमाले, रंजना पानमंद, जितेंद्र काळोखे, अक्षय खळदकर व पंचक्रोशीतील सर्वपक्षीय कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यात महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com