

JEU26B08265
चपळगाववाडी ः येथे पहिल्यांदाच उभारलेली पवनचक्की.
अक्कलकोटच्या ऊर्जा क्षेत्रात नवा ‘वाऱ्याचा’ अध्याय
पाच पवन ऊर्जा संचांची उभारणी; लगतच्या जमिनीवर शेतीही शक्य
अक्कलकोट, ता. १९ : अक्कलकोट तालुक्यातील ऊर्जा क्षेत्रात प्रथमच पवन ऊर्जेच्या निर्मितीच्या महत्वाच्या टप्याला सुरुवात झाली असून, चपळगाववाडी व चपळगाव परिसरात दोन, तर अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील दिंडूर व तीर्थ परिसरात तीन असे एकूण पाच पवन ऊर्जा संच उभारण्यात आलेले आहेत. त्यातील काही कार्यान्वित देखील करण्यात आले आहेत. त्यामुळे अक्कलकोटच्या ऊर्जा क्षेत्रात स्वच्छ व अक्षय ऊर्जेचा नवा अध्याय सुरू झाला आहे.
पवन ऊर्जा प्रकल्पातील संपूर्ण संचाला तांत्रिक भाषेत ‘विंड टर्बाइन’ म्हणतात. यामध्ये टॉवर (खांब), रोटर ब्लेड (पाते), हब (ब्लेडचा मध्यवर्ती जोडभाग), नॅसेल (यंत्रणा आवरण), जनरेटर, गिअरबॉक्स, मुख्य शाफ्ट यांसह विविध यंत्रणा असतात. वाऱ्याच्या वेगामुळे ब्लेड फिरतात. त्यातून निर्माण होणारी यांत्रिक ऊर्जा जनरेटरच्या माध्यमातून विद्युत ऊर्जेत रूपांतरित केली जाते.पवन ऊर्जा हा अक्षय ऊर्जा स्रोत असल्याने वारा नैसर्गिकरीत्या उपलब्ध असतो. वीज निर्मितीसाठी कोळसा, पेट्रोल किंवा डिझेलसारखे इंधन जाळण्याची आवश्यकता नसल्याने कार्बन उत्सर्जन व प्रदूषण कमी करण्यास मदत होते. तसेच पारंपरिक औष्णिक वीज प्रकल्पांच्या तुलनेत पाण्याची गरजही अत्यल्प असते. पवन ऊर्जा प्रकल्पांमुळे स्थानिक पातळीवरही आर्थिक संधी निर्माण होतात. पवनचक्क्यांसाठी जमीन भाडेतत्त्वावर दिल्यास जमीनमालकांना नियमित उत्पन्न मिळू शकते. तसेच प्रकल्प उभारणी, देखभाल, दुरुस्ती व वाहतूक यामुळे रोजगाराच्या संधी निर्माण होतात. पवनचक्क्या उभारलेल्या परिसरातील उर्वरित जमिनीवर अनेक ठिकाणी शेतीही सुरू ठेवता येते.
अक्कलकोटसारख्या ग्रामीण भागात पवन ऊर्जा प्रकल्पांमुळे स्वच्छ ऊर्जेला चालना मिळण्याबरोबरच स्थानिक पायाभूत सुविधांच्या विकासालाही हातभार लागू शकतो. वाऱ्याचा पुरेसा व सातत्यपूर्ण वेग आणि योग्य भौगोलिक ठिकाणाची निवड हे पवन ऊर्जा प्रकल्पाच्या यशासाठी महत्त्वाचे घटक आहेत.
प्रतिक्रिया
सध्या तालुक्यातील सुरू असलेला पवन ऊर्जेचा मुख्य लाभ म्हणजे वाऱ्याच्या आवश्यक वेगानुसार दिवसरात्र कधीही वीज निर्मिती सुरू राहू शकते. त्यामुळे सौर ऊर्जेपेक्षा ही बाब फायदेशीर आहे. त्याशिवाय सदर प्रत्येक संच कार्यान्वित करताना झाडे तोडणे वा अन्य पर्यावरणाचा ऱ्हास कंपनीकडून होत असते त्याची भरपाई करून संतुलन राखणे गरजेचे आहे.
- हरीश हर्डीकर
शेतकरी, अक्कलकोट.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.