

भाजीपाला लिलावाचे शेतकऱ्यांकडून स्वागत
अकोले, ता. ८ : शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळावा, या उद्देशाने अकोले तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीने सुरू केलेल्या भाजीपाला लिलाव मार्केटला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. कोतूळ, अकोले आणि समशेरपूर येथे लिलाव पद्धतीने भाजीपाला विक्री सुरू असून, त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या मालाचा बाजारभाव मिळण्यास मदत होत आहे.
कोतूळ येथील भाजीपाला मार्केटमध्ये दररोज शेतकरी मोठ्या प्रमाणावर भाजीपाला घेऊन येतात. लिलाव प्रक्रियेमुळे व्यापाऱ्यांसमोर मालाची बोली लागते आणि शेतकऱ्यांना अपेक्षित दर मिळण्याची संधी उपलब्ध होते. अकोले येथेही दुपारी तीन वाजता शेतमालाचा लिलाव सुरू होतो. त्यानंतर व्यापारी सायंकाळी कोतूळ येथे जाऊन शेतमालाची खरेदी करतात.
अकोले बाजार समितीच्या आवारात खरेदी केलेला भाजीपाला सुरत, अहमदाबाद, जयपूर, दिल्ली, कोलकाता, बंगळूर, हैदराबाद आदी बाजारपेठांमध्ये पाठविला जातो. त्यामुळे शेतकऱ्यांना पुणे-मुंबईपेक्षाही चांगला दर मिळत असल्याचे बाजार समितीचे सभापती भानुदास तिकांडे यांनी सांगितले.
तालुक्यात फळबागांचे क्षेत्र वाढत असून, पुढील काळात पपई, पेरू, केळी, डाळिंब, तसेच फुलांसाठीही लिलाव पद्धतीने बाजार सुरू करण्याचे नियोजन आहे. यासाठी व्यापाऱ्यांशी संपर्क साधण्यात येत आहे.
भाजीपाला मार्केट सुरू करण्यासाठी संगमनेर, नाशिक, घोटी, नारायणगाव आणि ओतूर परिसरातील व्यापाऱ्यांना विनंती करण्यात आली होती. मात्र, स्थानिक व्यापाऱ्यांनी पुढाकार घेतल्याने बाजाराला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे बाजार समितीचे अध्यक्ष तिकांडे यांनी सांगितले.
अकोले तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना थेट बाजारपेठ उपलब्ध झाली असून, दलालांवरील अवलंबित्व कमी होण्यास मदत होत आहे. त्यामुळे भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.