

अकोल्यात कपाशीच्या लागवडीत वाढीची शक्यता
--
सोयाबीन क्षेत्रात घट अपेक्षित
--
ॲग्रोवन वृत्तसेवा
अकोला : आगामी खरीप हंगामात अकोला जिल्ह्यात पीक पद्धतीत काही महत्त्वाचे बदल दिसून येण्याची शक्यता असून कपाशीच्या लागवडीत वाढ होण्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. जिल्ह्यात यंदा कपाशीची लागवड सुमारे १ लाख ४५ हजार हेक्टर क्षेत्रावर अपेक्षित असून, गेल्या हंगामाच्या तुलनेत हे क्षेत्र जवळपास ९ हजार हेक्टरने अधिक राहणार आहे. दुसरीकडे, सोयाबीनच्या क्षेत्रात घट होण्याची शक्यता असून ते सुमारे २ लाख २० हजार हेक्टरांपर्यंत मर्यादित राहू शकते. हे क्षेत्र मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे ५ हजार हेक्टरने कमी राहणार असल्याचे नियोजनातून स्पष्ट झाले आहे.
कृषी खात्याने मागील हंगामातील पीक पद्धती, बाजारातील स्थिती आणि शेतकऱ्यांचा बदलता कल लक्षात घेऊन यंदाच्या खरीप हंगामासाठी संभाव्य पीक लागवडीचे नियोजन केले आहे. त्यानुसार जिल्ह्यात एकूण ४ लाख ३१ हजार ८८४ हेक्टर क्षेत्र लागवडीखाली येण्याची शक्यता आहे. यामध्ये सर्वाधिक क्षेत्र सोयाबीनचे असणार असले तरी कपाशीच्या वाढत्या आकर्षणामुळे त्या पिकाच्या क्षेत्रात लक्षणीय वाढ अपेक्षित आहे.
तुरीच्या लागवडीतही वाढ होण्याची शक्यता असून यंदा हे क्षेत्र ६५ हजार हेक्टरांपर्यंत पोहोचू शकते. हे मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे ५ हजार हेक्टरने अधिक आहे. याशिवाय, यंदा संभाव्य अल निनोच्या प्रभावामुळे पावसाचे स्वरूप अनिश्चित राहण्याची शक्यता लक्षात घेता शेतकरी मूग आणि उडीद यांसारख्या कमी कालावधीच्या पिकांकडे वळू शकतात. त्यामुळे कृषी विभागाकडून या पिकांच्या बियाण्यांचे नियोजनही करण्यात येत आहे.
हंगामासाठी बियाण्यांचे नियोजन पूर्ण
आगामी खरीप हंगामासाठी जिल्ह्यात एकूण १ लाख ७ हजार ४८२ क्विंटल बियाण्यांचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये सोयाबीनसाठी ५७ हजार ७५० क्विंटल बियाण्यांची मागणी करण्यात आली आहे. यात महाबीज आणि राष्ट्रीय बियाणे निगमकडून ३० हजार ३०० क्विंटल, तर खासगी कंपन्यांकडून २७ हजार ४५० क्विंटल बियाण्यांचा पुरवठा अपेक्षित आहे. कपाशीसाठी सुमारे ७ लाख २५ हजार बियाण्यांची पाकिटे लागणार असून, त्यासाठी १२ लाख ४४ हजार पाकिटांची मागणी नोंदविण्यात आली आहे.
---
चौकट
त्या कपाशी वाणाची सहज उपलब्धता हवी
कपाशीच्या काही विशिष्ट वाणाची दरवर्षी मागणी राहत असून सदर बियाणे वाढीव दराने विक्री होत असल्याच्या दरवर्षी तक्रारी येतात. या हंगामामध्ये हाच प्रकार होण्याची शक्यता आहे. संबंधित वाण मिळावे यासाठी शेतकऱ्यांनी धडपड सुरू झाली असून त्यांना मागणी असलेले बियाणे सहजपणे मिळत नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.