अकोल्यातील ८२ हजार शेतकऱ्यांना दिवाळीची पाच हजारांची मदत नाहीच!

अकोल्यातील ८२ हजार शेतकऱ्यांना दिवाळीची पाच हजारांची मदत नाहीच!
Published on: 

अकोल्यातील ८२ हजार
शेतकरी ‘अग्रिम’पासून वंचित

अधिवेशनानंतर मतदारसंघनिहाय आंदोलनाचा आमदार नितीन देशमुख यांचा इशारा

अकोला ः दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्याची घोषणा करणाऱ्या राज्य सरकारकडून प्रत्यक्षात अकोला जिल्ह्यातील ८२ हजार शेतकऱ्यांना पाच हजार रुपयांची अग्रिम मदत मिळालेली नाही. जिल्ह्यातील तीन लाख सहा हजार पात्र शेतकऱ्यांपैकी हजारो शेतकरी मदतीपासून वंचित राहिले आहेत. त्यामुळे सरकारच्या घोषणांचा लाभ प्रत्यक्षात किती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या मुद्द्यावर उद्धवसेनेचे उपनेते तथा आमदार नितीन देशमुख यांनी राज्य सरकारवर टीका केली. तसेच हिवाळी अधिवेशनानंतर विदर्भात मतदारसंघनिहाय शेतकरी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला.

मंगळवारी (ता. १७) आयोजित पत्रकार परिषदेत देशमुख यांनी मदत वितरणातील त्रुटींवर प्रश्न उपस्थित केले. दिवाळीपूर्वी प्रत्येक दुष्काळग्रस्त शेतकऱ्याला पाच हजार रुपये अग्रीम मदत देण्याचे आश्वासन सरकारने दिले होते. मात्र, अकोला जिल्ह्यातील ८२ हजार शेतकऱ्यांच्या खात्यांत ही रक्कम जमा झालेली नाही. मग सरकारने दिलेले आश्वासन नेमके कोणासाठी होते, असा सवाल त्यांनी केला. पाच हजार रुपयांत भाजपच्या स्थानिक खासदार आणि आमदारांची दिवाळी साजरी झाली का, अशी टीकाही त्यांनी केली.

२० सप्टेंबरला अकोल्यात आलेले कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, २३ सप्टेंबरला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ३० सप्टेंबरला अकोल्यात आलेले महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिवाळीपूर्वी मदत देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, हजारो शेतकरी प्रत्यक्ष मदतीपासून वंचित राहिल्याचे देशमुख म्हणाले.

राज्य सरकारने शेतकऱ्यांना सरसकट एक लाख रुपये आर्थिक मदत द्यावी. अन्यथा, हिवाळी अधिवेशनानंतर विधानसभा मतदारसंघनिहाय उपविभागीय अधिकारी कार्यालयांवर मोर्चे काढण्यात येतील, असा इशारा त्यांनी दिला.

जिल्ह्यात मागील चार महिन्यांत ६४, तर राज्यात नऊ महिन्यांत २२२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचा दावाही त्यांनी केला. पत्रकार परिषदेला जिल्हाप्रमुख गोपाल दातकर, मुकेश मुरूमकार यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

फोटो : अकोला : पत्रकार परिषदेत बोलताना आमदार नितीन देशमुख.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.