

आळंदी, ता. १२ : दिवेआगार दुर्घटनेनंतर खडबडून जागे झालेल्या आळंदी नगर परिषदेच्या सर्वेक्षणात धक्कादायक वास्तव समोर आले आहे. शहरातील एकही कोचिंग क्लास परवानाधारक नसून, विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचे उघड झाले आहे. प्रशासनाच्या या बेफिकीरीमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
दिवेआगार येथील विनर अकॅडमीच्या सहलीत आठ विद्यार्थ्यांचा बळी गेल्यानंतर, आळंदी नगर परिषदेने केवळ विनर्स अकॅडमीला सील ठोकून कारवाईचा देखावा केला होता. या प्रकरणामुळे कोचिंग क्लासेसच्या वैधतेचा मुद्दा ऐरणीवर येताच, सोमवारी (ता. ५) शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी सोनाली झिंजुर्डे आणि सीमा चारभे यांच्या नेतृत्वाखाली चार पथकांनी हे सर्वेक्षण पार पाडले.
विनर्स अकॅडमीच्या इमारतीची वार्षिक व्यावसायिक करआकारणी ४५,६३४ रुपये असूनही, मालकाने अभय योजनेचा लाभ घेऊनही कर थकवला आहे. आता या बेकायदेशीर आणि नियमबाह्य क्लासेसवर केवळ कागदी घोडे नाचवले जाणार की ठोस कारवाई होणार, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला असून, प्रशासनाच्या भूमिकेवर तीव्र संशय व्यक्त होत आहे.
महत्त्वाचे मुद्दे
शहरात सर्वेक्षण केलेल्या १६ पैकी १६ कोचिंग क्लासेसकडे परवाना नाही.
प्रत्येक क्लासमध्ये सरासरी ८० ते १०० विद्यार्थी; शुल्काची मात्र सर्रास वसुली.
निष्काळजीपणास कारणीभूत ठरलेल्या विनर्स अकॅडमीच्या इमारतीवर १.३१ लाखांची कर थकबाकी आणि अतिरिक्त बेकायदा बांधकाम.
केवळ सात इमारतींचा व्यावसायिक कर भरणा, उर्वरित क्लासेसवर प्रशासनाची मेहेरनजर का?
नियमानुसार जे कोचिंग क्लास आणि इमारत मालक परवानाधारक नसतील त्यांना नोटीस बजावून सर्व परवानग्या घेण्याबाबत कळविले जाईल. मुदतीत जे परवानगी घेणार नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.
- माधव खांडेकर, मुख्याधिकारी, आळंदी नगर परिषद
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.