esakal | आळंदी दिघी पोलिसांकडून चाळीस लाखांचा मुद्देमाल जप्त

बोलून बातमी शोधा

crime

आळंदी-दिघी पोलिसांकडून चाळीस लाखांचा मुद्देमाल जप्त

sakal_logo
By
विलास काटे

आळंदी ः लॉकडाउन काळात बंदी असतानाही काळ्या काचांच्या अलिशान गाडीमधून विदेशी मद्याची अवैध आणि चोरटी वाहतूक केल्याप्रकरणी च-हो लीतील तिघांवर दिघी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. गाडीमध्ये साडेदहा हजार रूपये किंमतीच्या सत्तर विदेशी मद्याच्या बाटल्या होत्या. चाळिस लाखांची गुन्ह्यात वापरलेली काळ्या रंगाची फोर्ड कंपनीची इंडेव्हर गाडीही पोलिसांनी जप्त केली आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे च-होली वडमुखवाडीत तरूणाईमध्ये फोफावलेल्या दारू संस्कृतीला चाप बसला आहे.

या प्रकरणी फिर्याद दिघी पोलिस ठाण्यातील पोलिस हवालदार रमेश गायकवाड यांनी दिली. विनोद मुरलीधर तापकीर, (वय-३०), आनंद ज्ञानेश्वर थोरवे (वय-३०) वसीम हुसेन शेख (वय-२५) अशा च-होलीत राहणा-या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आळंदी पुणे रस्त्यावरिल च-होलीमध्ये विनामास्क फिरणारांवर दिघी पोलिसांचे पथक कारवाई करत होते. यावेळी काळ्या रंगाची इँडेव्हर (एमएच १४, जेएम २८२८ ) गाडीत बसून काही तरूण चऱ्होलीतील पठार मळ्याच्या दिशेने शनिवारी (ता. २४) रात्री सातच्या दरम्यान जात होते. मोठ्या आवाजात चारचाकी गाडीतील साऊडसिस्टीम लावून जात असताना नेमके गस्तीवरील पोलिसांचे लक्ष गेले आणि पोलिस उपनिरिक्षक भदाने, रमेश गायकवाड, मुकुंद काकणे या पोलिसांनी तत्काळ पाठलाग केला. यावेळी गाडीतील आरोपींना विचारणा केल्यावर त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. मग पोलिसांनी गाडीची तपासणी केली तर त्यामधे चक्क विदेशी मद्याच्या बाटल्या होत्या. च-होलीतील लकी वाईन शॉपमधून मद्याच्या बाटल्या आणल्याचे आरोपींनी कबूल केले. यावर पोलिसांनी चारचाकी गाडी आणि तीनही आरोपींना ताब्यात घेतले. याप्रकरणी अधिक तपास पोलिस उपनिरिक्षक भदाने करत आहेत.

दिघी पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे रस्त्याच्या कडेला तसेच माळरानावर अंधारात गाडीत बसून दारू पिणा-यांना आता चाप बसला आहे. जमिनीच्या प्लॉटींग आणि अन्य मार्गाने मिळणा-या पैशांमुळे रात्रीच्या अंधारात रस्त्याच्या कडेला तसेच माळरानावर बसून मद्याच्या बाटल्या रिचवायच्या आणि मोठ्या आवाजात गाणी म्हणायची हा तरूणाईचा ट्रेंड पोलिसांमुळे थांबले असे चित्र आहे.